जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा पुराचा धोका

March 30, 2015 12:47 PM0 commentsViews:

30 मार्च : गेल्या वर्षी आलेल्या महाकाय पुरातून सावरत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराचे संकट निर्माण झाले आहे. झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील अनेक भागांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भूस्खलानाच्या घटनांनी महामार्गावरील वाहतूकही खोळंबली आहे. रविवारी दरड कोसळल्याने 40 इमारतींचे नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आज (सोमवारी) पहाटे सहाच्या सुमारास झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली.

काश्मीर आणि श्रीनगर इथे झेलम नदीने अनुक्रमे 19 फूटांची पातळी गाठली आहे. नदीने 23 फूटांची पातळी ओलांडल्यास पुन्हा हाहाकार माजेल अशी भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या 95 जवानांना जम्मू काश्मीरमध्ये पाठवलं आहे. पावसामुळे जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद पडला असून अनेक ठिकाणी नागरिक घरांमध्ये अडकून पडली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 31 मार्चपर्यंत शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे.

दरम्यान, येत्या 24 तासांमध्ये कुलगाम, फुलवामा, बारामुल्ला, कुपवाडा, कारगिल जिल्ह्यांना दरड कोसळण्याचा इशारा देण्यात आलाय. येत्या आठवड्यात काश्मीरमध्ये आणखी पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामानखात्यानं दिला आहे. त्याच बरोबर, येत्या 72 तासात हवामानाच्या परिस्थीतीत कोणताही फरक पडणार नसून बर्फवृष्टी होण्याची शक्यताही हवामानखात्याने वर्तवली आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे संपूर्ण जम्मू काश्मीर राज्याला दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close