अहमदनगर : पैशांचा हिशोब मागितला म्हणून बलात्कार!

March 31, 2015 2:38 PM0 commentsViews:

 

31 मार्च : अहमदनगर जिल्ह्यातलं सोनई पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यावेळी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या पैशांचा हिशोब विचारला म्हणून गावातल्या माजी सरपंचासह चौघांनी या महिलेवर बलात्कार केला. सोनईतल्या राजेगाव परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर शहराजवळील राजेगावच्या तारकेश्वर गडावर आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी 30 लाख रुपयांची वर्गणी जमा करण्यात आली होती. पीडित महिलेच्या पतीने भाजपचा माजी सरपंच लक्ष्मण घुले याला या वर्गणीचा हिशोब मागितला होता. त्यामुळे चिडलेल्या घुलेने त्याच्या चार साथीदारांनी रविवारी रात्री पीडित महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवशी या सर्वांनी त्यांच्या घरात घुसून पीडित महिलेच्या 21 वर्षीय मुलालाही मारहाण करून त्याला बांधून ठेवले. त्यानंतर सरपंचासह त्याच्या अन्य तीन साथीदारांनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यासंदर्भात महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सरंपचासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सरपंचाच्या अल्पवयीन मुलीच्या लग्नाला पीडित महिलेल्या कुटुंबियांनी विरोध केला होता. गावातल्या अनेक सामाजिक कार्यक्रमात या महिलेचा पुढाकार असायचा. त्याचाही राग सरपंचाच्या मनात होता. या रागातूनच सूड उगविण्यासाठी हे अमानूष कृत्य केल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close