विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल असाच प्रयत्न करू – नारायण राणे

April 2, 2015 6:14 PM0 commentsViews:

02 एप्रिल : बहुचर्चित वांद्रे पूर्व मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आता हळूहळू रंग चढू लागला आहे. ‘सरकारला सध्या पैशांची गरज आहे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाली तर सरकारला थोडी मदत होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू’ असं म्हणत ‘ही निवडणूक आपण एकतर्फी जिंकू’ असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. राणे यांनी आज (गुरूवारी) सहकुटुंब वांद्र्यातील कलानगर भागात प्रचारासाठी पदयात्रा काढली होती. विशेष म्हणजे या पदयात्रेत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणेंच्या पत्नी नीलम राणेही सहभागी झाल्या होत्या.

‘कोकणातील जनतेप्रमाणेच मुंबईतील जनताही राणे साहेबांना विजयी करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ‘कोकणातील जनेतनं ज्याप्रमाणे राणेंवर विश्वास टाकला आहे. तसाच कलानगरमधील लोक विश्वास टाकतील. लोकांना राणे साहेबांच्या कामावर विश्वास असून त्यांच्यासारख्या नेत्याला नक्कीच विजयी करतील, अशी अपेक्षा नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या पदयात्रेवेळी शिवसैनिक आणि राणे समर्थक यांच्यात संघर्ष होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण तसं काहीही झालं नाही. यावरून शिवसेनेने राणे यांच्या पदयात्रेकडे दुर्लक्ष करुन अनुल्लेखाने टाळल्याची रणनिती आखल्याचं दिसून आलं.

राणे यांनी यापूर्वी सिंधुदुर्गातून निवडणुका लढवल्या होत्या. त्यांच्या कार्यकर्त्यांना राणेंच्या मतदारसंघातील गल्लीबोळ माहिती आहेत. पण आजच्या प्रचारात मात्र राणेंचे कार्यकर्ते गोंधळलेले दिसत होते. नेमकं कोणत्या गल्लीबोळात जाऊन प्रचार करायचा याचं मार्गदर्शन स्वत: नारायण राणेच करत होते. राणेंनीही शिवेसेनेवर कोणतीही टीका करण्याचं टाळून संयमी भूमिका घेतलेली दिसली.

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीमध्ये तिरंगी लढत होते आहे. शिवसेनेकडून बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून नारायण राणे मैदानात आहेत. एमआयएमनंही इथं उमेदवार दिल्यानं सध्या तिरंगी लढत होते आहे. त्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं आहे. 11 एप्रिलाला इथं मतदान होणार आहे. तर 15 एप्रिलला मतमोजणी आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close