पाकिस्तान चीनकडून 8 पाणबुड्या खरेदी करणार

April 2, 2015 9:32 PM0 commentsViews:

submarine_pak_china_759

02 एप्रिल : पाकिस्तान सरकारने काल (बुधवारी) चीनकडून 8 पाणबुड्यांची खरेदी करण्याच्या निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी संसदेतील संरक्षणविषयक स्थायी समितीच्या सुनावणीदरम्यान या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. 2011पासून 6 पाणबुड्यांच्या खरेदीसाठी पाकिस्तान सरकार चीनशी चर्चा करत असून, आता पाकिस्तानने आणखी 2 पाणबुड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनकडून खरेदी करण्यात येणार्‍या पाणबुड्यांचा प्रकार आणि किंमतीबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती पाकिस्तानी नौदलाच्या अधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनूसार, चीनकडून पाकिस्तानला ‘युआन क्लास’ प्रकारातील ‘041 डिझेल-इलेक्ट्रीक पाणबुड्या’ मिळणार असल्याचे समजते. या सगळ्या पाणबुड्यांची किंमत 4 ते 5 बिलियन डॉलर्सच्यादरम्यान असल्याचे समजते. डिझेल-इलेक्ट्रीक प्रकारातील या पाणबुड्यांमध्ये पाण्यातून मार्गक्रमणा करण्यासाठी अद्ययावत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. याशिवाय, वायजे-2 (वायजे-82) हे युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्र या पाणबुडीवर तैनात असेल.

शस्त्रास्त्र विक्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास हा चीनसाठी आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सौदा ठरू शकेल. यापूर्वी पाकिस्तानने 2010मध्ये चीनकडून एक बिलियन डॉलर्सच्या मोबदल्यात 50 जेएफ या लढाऊ विमानांची खरेदी केली होती. गेल्या 5 वर्षांमध्ये पाकिस्तान चीनकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची आयात करत असून, चीनच्या शस्त्र निर्यातीमध्ये पाकिस्तानचा वाटा 40 टक्के इतका आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close