महापालिका निवडणुकीसाठी युतीवर शिक्कामोर्तब

April 6, 2015 7:49 PM0 commentsViews:

Yuti banner

06 एप्रिल : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी अखेर शिवसेना भाजपची युती झाली आहे. औरंगाबादमध्ये 64 – 49 तर नवी मुंबईत 68 – 43 असा फॉर्म्युला ठरला आहे. औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा केली.

औरंगाबाद महापालिकेच्या सर्व 113 जागा लढवण्याची घोषणा शिवसेना- भाजप युतीने केली. औरंगाबादेत शिवसेना 64 तर भाजप 49 जागा लढवणार आहे. तर दुसरीकडे 111 सदस्यसंख्या असलेल्या नवी मुंबई महापालिकेतही शिवसेना – भाजप युती मैदानात उतरणार असून शिवसेना 68, तर भाजप 43 जागा लढवेल अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे.

दरम्यान, औरंगाबाद,आणि नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी महायुतीतल्या घटक पक्षांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने औरंगाबादमध्ये 20 तर नवी मुंबईत 10 जागा लढवण्याचं जाहिर केलं आहे.

आघाडीत बिघाडी कायम
युती मार्गी लागली असली तरी आघाडीत मात्र बिघाडी कायम आहे. औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेत दोन्ही काँग्रेस वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसला अल्टीमेटम दिला होता. आज सकाळी 10 वाजेपर्यंत हा अल्टिमेटम संपला. सकाळी 10 वाजेपर्यंत आघाडीची भूमिका मांडली नाही तर राष्ट्रवादी आपली 113 उमेदवारांची यादी जाहीर करेल, असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. आता मुदत संपल्याने राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close