औरंगाबादमध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड

April 7, 2015 2:35 PM0 commentsViews:

aurangabad

07 एप्रिल :  औरंगाबाद महापालिका निवडणुकसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज इच्छुकांची अर्ज भरण्यासाठी सकाळपासून झुंबड उडाली आहे. सगळ्या केंद्रांवर गर्दी झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

औरंगाबाद महापालिकेच्या सगळ्या 113 जागा लढवण्याची घोषणा शिवसेना- भाजप युतीने केली. औरंगाबादमध्ये शिवसेना 64 तर भाजप 49 जागा लढवणार आहे. पण युती झाल्याने या दोन्ही पक्षांकडून इच्छुक असलेल्या अनेकांची संधी जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर संभाव्य बंडखोरांचं मोठं आव्हान असणार आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबद्दल अजूनही संभ्रम आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसला जो अल्टीमेटम दिला होता त्याला काँग्रेसने प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने जवळपास 70 इच्छुकांना एबी फार्म वाटले आहेत. एमआयएमच्या एबी फार्म वाटपातही मोठा गोंधळ झाला. यावेळी एमआयएमच्या नेत्यांना उमेदवनारांनी धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गेली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात काही जण अजूनही तळ ठोकून बसले आहेत. शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने फॉर्म भरण्याच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, औरंगाबादच्या महापौर कला ओझा, शिवसेनेचे राजू वैद्य, दिग्विजय शेरखाने, राजेंद्र जंजाळ या शिवसेनेच्या मान्यवरांनी आज अर्ज भरले आहेत. त्याचप्रमाणे खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा रुषीकेश खैरे , पुतण्या सचिन खैरे यांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे जालिंद्र शेंडगे यांनी बंडखोरी असून त्यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close