21 दिवसांच्या तान्हुल्याला तापलेल्या सळईचे चटके!

April 9, 2015 2:30 PM0 commentsViews:

09 एप्रिल : महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू तर झाला पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अजूनही योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. मेळघाटात याच अंधश्रद्धेतून अवघ्या 21 दिवसांच्या तान्हुल्याला तापलेल्या सळईचे चटके देण्यात आलेत. मेळघाटातल्या माडीझडप गावात ही घटना घडली आहे.

माडीझडप गावातील एका अविवाहित तरुणीने 18 मार्च रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. या बाळाचं पोट फुगलं होतं. त्यामुळे उपचारांसाठी त्याला डॉक्टरांऐवजी मांत्रिकाकडे नेण्यात आलं आणि या क्रूर मांत्रिकाने त्या बाळाला तापलेल्या सळईचे चटके दिलेत. यात 21 दिवसांचं चिमुकलं बाळ गंभीर जखमी झालंय. यानंतर त्याच्यावर पहिल्यांदा अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. दरम्यान बाळाची तब्बेत जास्त गंभीर झाल्याने बाळाला नागपूरच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मेळघाटमध्ये आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केलेत. पण त्याचा काहीच फायदा दिसत नाहीय. मेळघाटमध्ये आजही लोक डॉक्टरांकडे न जाता मांत्रिकाकडे जातात. आजार बरा करण्यासाठी मांत्रिक असंवेदनशीलपणे अघोरी उपचार करतात.

दरम्यान, मेळघाटमध्ये कुणालाही त्रास झाल्यास त्याच्या पोटावर डंम्बा म्हणजेच तापलेल्या सळीने चटके देत असल्याचं खुद्द मांत्रिकानेच मान्य केले आहे. अशा घटनांमुळे एकीकडे मेडिकल टुरिझममध्ये वेगाने प्रगती करणार्‍या भारतातल्या दुर्गम भागात हीच आरोग्य व्यवस्था किती कोलमडली आहे, ते समोर आलं आहे. यामुळे प्रशासन कसं अपयशी ठरतंय, तेच अधोरेखित होत आहे.

राज्यात अंधश्रद्धेला मुठमाती देण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी जो लढा उभारला त्यासाठी लढताना त्यांची हत्या झाली. पण अजूनही राज्यातील अंधश्रद्धा कमी होताना दिसत नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close