पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या

April 9, 2015 7:24 PM0 commentsViews:

09 एप्रिल : वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीचा प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. आज शेवटच्या दिवशी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी रोड शो केला. तर काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्या समर्थकांनी बाईक रॅली काढली. दुसरीकडे एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही घरोघरी जाऊन प्रचार केला.

प्रकाश सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात निवडणूक होत आहे. येत्या शनिवारी मतदान म्हणजे 11 एप्रिलला इथे मतदान होणार असून 15 एप्रिलला निकाल जाहीर होईल.

शिवसेनेनं बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने थेट नारायण राणेंना रिंगणात उतरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्या बालेकिल्ल्यात पराभवाचा धक्का बसलेल्या राणेंसाठी ही अस्तित्वाचीच लढाई मानली जातेय. त्यामुळे आता वांद्र्यात तृप्ती सावंत विरुद्ध नारायण राणे असा, म्हणजेचं शिवसेना विरुद्ध राणे अशी ‘काँटे की टक्कर’ होणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर एमआयएमनंही सिराज खान यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळतीये.

वांद्रे पूर्व या मतदार संघात मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय असल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेसमोर एमआयएम आव्हान ठरण्याची शक्यता आहे. ही लढत सेनेसाठी प्रतिष्ठेची आणि राणेंसाठी अस्तित्वाची मानली जात आहे. तसंच ओवेसी बंधूंनीही काँग्रेस आणि शिवसेनेला धोबीपछाड देण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे निवडणुकीत कुणाचं पारडं जड ठरणार हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, दिवंगत माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या तासगाव विधानसभेसाठी त्यांच्या पत्नी सुमन पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या विरोधात कोणीही उभं नसल्याने, या मतदार संघात त्यांचा विजय निच्शित आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close