मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांसाठी 12 ते 9 प्राईम टाइम!

April 9, 2015 9:51 PM0 commentsViews:

s1.reutersmedia

09 एप्रिल : मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्समध्ये दुपारी 12 ते रात्री 9 हा प्राईम टाइम निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मराठी चित्रपटांसाठी दुपारी 12 ते रात्री 9 या वेळेत मागणीप्रमाणे मल्टिप्लेक्समधील शो उपलब्ध करून दिले जातील, अशी हमी आज (गुरुवारी) मल्टीप्लेक्स मालकांनी राज्य सरकारला दिले. मराठी चित्रपट निर्माते आणि मल्टीप्लेक्सचालकांनी आज (गुरुवारी) दुपारी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची विधान भवनात भेट घेतली. त्यानंतर या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांबद्दल माहिती देण्यात आली.

मल्टिप्लेक्समध्ये ‘प्राईम टाइम’मध्ये मराठी चित्रपट दाखवणं हे 2010च्या सरकारी आदेशानुसार बंधनकारक आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली होती. पण, मराठी चित्रपट प्राईम टाइमला दाखवलं जात असले तरी सायंकाळी 6 आणि 9 ची वेळ मराठी चित्रपटांसाठी देण्यास मल्टिप्लेक्सकडून टाळाटाळ केली जाते, ही वेळ मराठी चित्रपटांना मिळायला हवी, अशी मागणी मराठी निर्माता-दिग्दर्शकांनी केली आहे. तावडे यांच्या निर्णयाचे मराठीजनांकडून स्वागत करण्यात आले होते. तर बॉलिवूडमधील काही जणांनी त्यांच्यावर टीका केली. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी मल्टीप्लेक्स मालक, मराठी चित्रपट निर्माते आणि तावडे यांची बैठक झाली.

या बैठकीत दुपारी 12 ते रात्री 9 ही प्राईम टाइम वेळ निश्चित करण्यात आली आहे. तसंच मराठी निर्मात्यांनी त्यांना हवी असलेली वेळ सांगावी, असं या बैठकीत ठरलं आहे. यासाठी मल्टीप्लेक्स आणि मराठी निर्मात्यांची एक समिती नेमण्यात येईल आणि कुणाला कुठला वेळ द्यावा याचा निर्णय ही समिती घेईल असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close