‘टीकाकारांना लाज वाटली पाहिजे’, अखेर विराटने मौन सोडले

April 10, 2015 5:45 PM0 commentsViews:

Virat-Kohli_Anushka-Sharma-1

10 एप्रिल : वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे टीकांचा धनी झालेला विराट कोहलीने अखेर आपलं मौन सोडलं आहे. एक व्यक्ती म्हणून अशा टीकांमुळे अतिशय दु:ख होतं. चाहत्यांच्या या वागण्यामुळे मी अतिशय दुखावलो गेलोये. टीकाकारांना त्यांच्या वागण्याबद्दल लाज वाटली पाहिजे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया विराटने दिली.

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात अवघी 1 धाव काढून तंबूत परतलेला विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मावर सोशल मीडियावरून चाहत्यांनी तोंडसुख घेतलं होतं. इतके दिवस या विषयावर काहीही न बोलणार्‍या विराटने अखेर शुक्रवारी आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, ‘या घटनेमुळे मी खूप निराश झालो. गेल्या 5 वर्षांपासून मी सातत्याने चांगली कामगिरी करत आलो आहे. तसंच गेल्या काही वर्षांत टीम इंडियाने जिंकलेल्या मॅचमध्ये नक्कीच माझा मोलाचा वाटा राहिला आहे, असं मला मनापासून वाटतं. पण, फक्त एका मॅचमधल्या अपयशामुळे मला टीकेचे धनी व्हावं लागलं. अशा घटनांमुळे तुम्ही लोकांवरील विश्वास गमावता. त्या सामन्यानंतर चाहत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अतिशय निराशजनक होत्या’, असे सांगत कोहलीने त्याचं दु:ख व्यक्त केलं. तसंच अशा घटनेमुळे कोणावर विश्वास ठेवावा आणि कोण तुमच्या सोबत आहे हे देखील समजते, असंही तो पुढे म्हणाला.

दरम्यान, क्रिकेट चाहत्यांनी जरी विराटवर टीकास्त्र सोडले असले तरी अनेक दिग्गज क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटी विराट आणि अनुष्काच्या समर्थनार्थ पुढे आले. विराट-अनुष्काच्या नात्याचा आदर राखायला सांगत शांत रहा असे आवाहन सेलिब्रिटींनी केलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close