‘जैतापूर’ला देशहितासाठीच, कुणीही विरोध करू नये – मुख्यमंत्री

April 11, 2015 3:58 PM0 commentsViews:

jdfasjjadfajskdfj

11  एप्रिल : शिवसेनेच्या जैतापूर प्रकल्पविरोधी भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली असून पंतप्रधानांनी देशाच्या हिताचाच करार फ्रान्सशी घडवून आणला आहे. त्यामुळे कारण नसताना कुणीही वाद निर्माण करू नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला लगावला.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या जैतापूर अणूऊर्जा प्रकल्पाच्या पूर्तीच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाला वेग देणाऱ्या महत्त्वपूर्ण करारावर पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोई होलांडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

पण, मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचा जैतापूर प्रकल्पाला तीव्र विरोध असतानाही मोदी यांनी हा करार केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत अद्याप मौन बाळगले असले तरी सातत्याने जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या शिवसेनेकडून मोदींच्या करारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आधीच शिवसेनेचे नाव न घेता निशाणा साधून जैतापूर विरोध कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जैतापूर प्रकल्पावर शिवसेनेचे आम्ही मन वळवू असं आधीच विधिमंडळात सांगितलेले असताना आज मुख्यमंत्र्यांनीही या प्रकल्पाला कुणीही विरोध करू नये, असं सांगून सरकारची भूमिका अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेची चांगलीच गोची झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे खासदार रामदास आठवले यांनी जैतापूर प्रकल्पाला विरोध केला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी हानीकारक असल्याने तेथून अन्यत्र हलवण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. याप्रश्नी आपण राज्यसभेत आवाज उठवणार, असेही त्यांनी सांगितले. तर जैतापूरबाबत शिवसेना लाचार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी दिली आहे. जैतापूरला विरोध हा शिवसेनेचं ढोंग असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close