राज्याला पुन्हा गारपिटीने झोडपलं!

April 13, 2015 9:30 PM0 commentsViews:

13  एप्रिल :  राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह अनेक ठिकाणी गेले अनेक दिवस जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू आहे. यामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून अनेकांची घरंही उद्‌ध्वस्त झाली आहेत. एप्रिल महिन्यात चक्क जुलै महिन्यातील श्रावणासारखा पाऊस पडतो आहे. येत्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवलेला आहे. त्यामुळे उद्या (मंगळवारी) पुन्हा गारपिटीची टांगती तलवार शेतकर्‍यांच्या डोक्यावर कायम आहे.

मराठवाड्यात तर पावसाने अक्षरश: थैमान घातला आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि नांदेडमध्ये दुपारनंतर विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. परभणी जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाने धुमाकुळ घातला आहे. आळंद, वस्सा, आसेगाव, येलदरी गावात गारपीट झाली आहे. आळंदमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला तर एक गायही दगावली. पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातही सलग तिसर्‍या दिवशी आलेल्या पावसामुळे आंबा, द्राक्ष, टरबूज आणि भाजीपाल्यांचे मळे उद्‌ध्वस्त झाले. गहू, ज्वारी ही पिकंही आडवी झाली. बीडमध्येही डाळींब आणि पपईच्या बागांचं नुकसान झालं. तर पालेभाज्या भुईसपाट झाल्या. बीडमध्ये झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला. तर नांदेड जिल्ह्यात मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली आणि नायगाव या गावांमध्ये गारपीटही झाली. मुखेड तालुक्यात BSNLच्या ऑफिसवरचा मोबाईल टॉवर तुटल्याने 70 ते 80 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला. जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमध्ये आलेल्या पावसामुळे कायम तहानलेल्या असलेल्या या तालुक्यात विहिरींना पाणी आलंय. औरंगाबादमध्ये सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. पण, या पावसानं त्यावर पाणी फेरलं. सर्वच पक्षांना आपल्या प्रचार फेर्‍या काहीवेळ स्थगित कराव्या लागल्या.

उत्तर महाराष्ट्रात नंदूरबारमध्ये सलग तिसर्‍या दिवशी पाऊस झाला. त्यामुळे अनेक गावांमध्ये वीज गेली. तर मनमाड शहरातही सलग तिसर्‍या दिवशी पाऊस झाला. येवल्यातही पाऊस झाला. भुसावळमधल्या बोदवड तालुक्यातही अनेक ठिकाणी वीजतारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. अनेक घरांवरचे पत्रे उडाले. तसंच केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध अंजीर, डाळिंब, सीताफळाच्या फळबागांचं गारपिटीमुळे नुकसान झालं आहे.

या अवकाळी पावसामुळे रब्बीचा उरला सुरला हंगामसुद्धा गेला आहे. हातातोंडाशी आलेला घास या गारपीटीनं काढून घेतलाय. यामुळे शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारनं याची तात्काळ दखल घेऊन मदत करण्याची मागणी शेतकरी नेते करत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close