मावळ गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी करा- हायकोर्टाचे आदेश

April 16, 2015 4:59 PM0 commentsViews:

maval

16  एप्रिल : मावळ गोळीबार प्रकरणी पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच कांताबाई ठाकर या महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केल्यानंतर हायकोर्टाने या घटनेची पुन्हा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

2011मध्ये पुण्याजवळ मावळ इथे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबाराची चौकशी करण्यासाठी एम. जी. गायकवाड आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाचा अहवाल याचिकाकर्ते ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी कोर्टासमोर सादर केला. कांताबाई ठाकर या महिलेचा मृत्यू तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या गोळीनेच झाला होता, असं या अहवालात म्हटलं आहे.

कांतीबाई ठाकर या उताराच्या दिशेने धावत गेल्या होत्या आणि त्यादिशेने संदीप कर्णिक यांनीच गोळीबार केला होता, असा आरोप खंडेलवाल यांनी केला. त्यावर निरीक्षण नोंदवताना तपासात या अहवालाची दखल का घेतली नाही, असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला.

तसेच या गोळीबार प्रकरणाची पुन्हा चौकशी करून संदीप कर्णिक यांच्यावर योग्य कारवाई करा आणि त्याचा अहवाल येत्या सात दिवसांत कोर्टात सादर करा, असं आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे संदीप कर्णिक यांच्यावर सरकार आता कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्वाचं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close