राजकारण सोडेन पण शिवसेनेत जाणार नाही – नारायण राणे

April 17, 2015 5:30 PM1 commentViews:

Narayan Rane resigns

17  एप्रिल : राजकारण सोडेन पण शिवसेनेत जाणार नाही, असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. वांद्रे पूर्व इथल्या निवडणुकीतील पराभवानंतर IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. शिवसेना आता वाघ राहिलेला नाही, तर मांजर झाली आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली. शिवसेनेत आता कोणीही निष्ठावान सैनिक उरले नसल्याचे सांगत बाळासाहेब गेल्यानंतर सर्वांचीच निष्ठा संपली आहे, आता उरलेत ते कमर्शिअल शिवसैनिक असा आरोपही राणेंनी केला.

वांद्र्यातल्या पराभवानंतर काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आज पहिल्यांदा मौन सोडलं. वांद्र्यातील पराभवानंतर राणेंची राजकीय कारकीर्द संपली अशी टीका करणार्‍या सेना नेत्यांनाही त्यांनी खडे बोल सुनावले. एमआयएमला मॅनेज करण्यासाठी राणेंनी पाच कोटींची ऑफर दिली होती, या रामदास कदमांच्या आरोपलाही त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. रामदास कदम हा अतिशय बेजबाबदार माणूस असून कॅबिनेट मंत्री होण्याची त्यांची लायकी नसल्याचे राणेंनी म्हटलं. तसंच मी जेव्हा सेनेत होते, तेव्हा या नेत्यांची माझ्या आजूबाजूला उभा रहायचीही हिंमत नव्हती. ज्यांचे स्वत:चे काही कर्तृत्व नाही, त्यांची माझ्या भविष्याबद्दल बोलण्याची लायकी नाही, असा टोलाही त्यांनी हाणला.

मुंबई महानगरपालिका हे शिवसेनेचं दुकान असून कामधंदा न करता मनपाच्या टक्केवारीवर जगणारी अनेक कुटुंब शिवसेनेत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. गेल्या 22 वर्षांपासून मुंबईत सेनेची सत्ता आहे, मात्र तरीही नागरिकांसाठी पुरेशा सुविधा नाहीत. मुंबई मनपाएवढा भ्रष्टाचार संपूर्ण देशात कुठेही होत नाही. सेना मुंबई, ठाणे मनपाच्या जीवावर जगते, असे ते म्हणाले. आगामी महापालिका निवडणुकीत आपण काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Amol

    राणे आज निवडणूक हरले असले तरी त्यांनी ४० वर्ष या संघटनेसाठी काम केले आहे.. उद्धव ठाकरेंनी जेवढे वर्ष शिवसेने साठी काम केले नाही तेवढे त्यांनी केले आहे. पण शिवसेने मध्ये अंतर्गत जातीवाद होत आहे, तसेच उद्धव यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना कार्याध्यक्ष केले गेले, या कारणांमुळे ते शिवसेनेतून बाहेर पडले. यात गैर ते काय?

close