राणेंना वांद्रे पोटनिवडणूक न लढवण्याचा दिला होता सल्ला -अजित पवार

April 18, 2015 8:30 PM0 commentsViews:

Ajit Pawar PC18 एप्रिल : नारायण राणे यांनी वांद्रे पूर्वची पोटनिवडणूक लढायला नको होती. तसा सल्लाही मी नारायण राणे यांना दिला होता असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज शनिवारी केलाय.

विधानसभा निवडणुकीत आपल्याच होमग्राऊंडवर पराभवानंतर वांद्रे पोटनिवडणुकीत काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आपलं नशीब आजमावून पाहण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांच्या हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला. वांद्रे पोटनिवडणुकीत नारायण राणे यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांच्या पराभवावर शिवसेनेनं चांगलंच तोंडसुख घेतलं. राणेंनीही शिवसेनेसह आपल्याच पक्षावर ‘प्रहार’ही केला. मात्र दुसरीकडे आता काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने पहिल्यांदा यावर प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे यांनी आपल्याला फोन केला होता. आणि आपण वांद्रे पोटनिवडणूक लढवत आहोत असं सांगितलं होतं. मात्र, आपण त्यांना निवडणूक न लढवण्याचा सल्ला दिला होता असा खुलासा अजित पवार यांनी केलाय. राणेंना सल्ला दिल्ल्यानंतरही त्यांनी वांद्रे मतदारसंघ आपल्या ओळखीचा आहे. आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचंही राणे म्हणाले होते असंही अजित पवार म्हणाले.

तसंच माळेगाव साखर कारखान्याचा पराभव जिव्हारी लागल्यानं सोमेश्वरची निवडणूक योजनाबद्ध पद्धतीनं लढवली अशी कबुली अजित पवारांनी दिलीये. धनशक्तिचा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचंही अजित पवार म्हणालेत. विजय शिवतारेंनी केलेल्या आरोपाबाबत बोलताना गुंजवनी धरण पाणी बारामतीला पळवत असल्याचा शिवतारेंचा आरोप हा कीव आणणारा आहे असा टोलाही अजित पवारांनी लगावलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close