भूसंपादन विधेयकावरून गोंधळ; लोकसभेचं कामकाज सुरू

April 20, 2015 12:46 PM0 commentsViews:

parliament_231211

20  एप्रिल : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्राची सुरुवात प्रचंड गदारोळाने झाली आहे. विरोधकांच्या गदारोळातच सरकारनं भूसंपादन दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात हे दुरुस्ती विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर होऊ शकलं नाही. त्यामुळे ते नव्याने लोकसभेत मांडलं गेलं. पण विधेयक मांडताच विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी आणि गदारोळाला सुरुवात केली. या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं.

यापूर्वी लोकसभेचं कामकाज सुरू होताच केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ घातला. तसंच घोषणाबाजीही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी सभागृहाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्यामुळे सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.

काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी या विषयावरून स्थगन प्रस्ताव दिला होता. तो नाकारत लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी शिंदे यांना बोलण्याची संधी दिली. ते म्हणाले, गिरीराज सिंह यांनी आमच्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल केलेले वक्तव्य हे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे त्यांनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहाची माफी मागितली पाहिजे.

दरम्यान, संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी मंत्र्याने केलेले वक्तव्य निश्चितच आक्षेपार्ह आहे. त्याचे समर्थन कधीच करता येणार नाही, असे सांगितले. त्याचवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये पंतप्रधानांना ओढू नये, असेही मत त्यांनी मांडले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close