पंतप्रधान फक्त भाजप पक्षाचेच का?, राहुल गांधींचा घणाघात

April 20, 2015 6:02 PM0 commentsViews:

rahul gandhi in lc20 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी कमबॅक केलं असून आज लोकसभेत भुसंपादन विधेयकाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. हे सरकार सूटाबूटातील लोकांचे आणि उद्योगपतींचे सरकार आहे अशी घणाघाती टीका केली. तसंच पंतप्रधान हे भाजप पक्षाचे आहे की देशाचे आहे ?, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकसभेच्या बजेट सत्राच्या दुसर्‍या भागाला सुरूवात झाली पण भूसंपादन विधेयकाच्या मुद्यावरून लोकसभेत वातावरण चांगलंच तापलं होतं. दुपारच्या सत्रात राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच भूसंपादन विधेयकावर निवेदन सादर केलं. राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. हे सरकार शेतकरी आणि मजुरांच्या विरोधात काम करत असून त्यांनी आवाज उठवला तर वटहुकूम काढून त्यांचा आवाज दाबला जात आहे अशी टीका राहुल गांधींनी केली. तसंच हे सरकार उद्योगपतींचे सरकार आहे. शेतकर्‍यांच्या जमिनी हस्तांतरीत करण्याचा घाट या विधेयकातून घातला जात असून या जमिनी उद्योगपतींना विकल्या जाणार आहे असा घणाघातही राहुल यांनी केला. तसंच देशातील 60 टक्के शेतकरी आणि मजूर हे विधेयकाच्या विरोधात आहे. पंतप्रधानांनी याची नोंद घेऊन आपली भूमिका बदलावी अशी आमची इच्छा आहे. कारण, आज त्यांना दुखावलं तर ते उद्या तुम्हाला दुखावतील हेही लक्षात ठेवा असा सल्लावजा टोलाही राहुल यांनी लगावला. त्यानंतर राहुल गांधींनी आपला मोर्चा नितीन गडकरींकडे वळवला. शेतकर्‍यांची मदत देवही करू शकत नाही आणि सरकारही असं वक्तव्य गडकरींनी केलं होतं. अशा वक्तव्यामुळे एनडीए सरकारची मानसिकता दिसून येत आहे. पंतप्रधानांनी स्वत: शेतकर्‍यांची भेट घेऊन समस्या जाणून घ्याव्यात असा सल्ला राहुल यांनी दिला.

राहुल गांधींच्या भाषणात भाजप सदस्यांचा गोंधळ

राहुल गांधी भाषणाला उभे राहिले असता भाजपच्या सदस्यांनी एकच गोंधळ सुरू केला होता. भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. त्याला प्रत्युत्तर देत काँग्रेसच्या सदस्यांनीही भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. अखेरीस संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी संसदेत सर्वांना बोलण्याचा अधिकार असून राहुल यांना बोलू द्या, त्यानंतर त्यांना उत्तर देऊ असं सांगत भाजपच्या सदस्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर राहुल यांनी आपलं निवेदन पूर्ण केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close