बेळगावात अवतरली शिवसृष्टी…

April 24, 2015 1:09 PM0 commentsViews:

belgaon4424 एप्रिल : बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलीये. यावेळेस शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या घटनांवर आधारित चित्ररथ आणि जिवंत देखावे मिरवणुकीत सादर झाले होते. तसंच पारंपरिक मराठमोळी वेशभूषा करून बेळगावातले नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग जिवंत देखाव्याद्वारे सादर केलेल्या चित्र रथ मिरवणुकीत जणू काही साक्षात शिवसृष्टी अवतरली होती असा भास बेळगावातील रस्त्यावर निर्माण झाला होता.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने बेळगाव शहरात भव्य अशी चित्र रथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हत्ती,उंट,घोडे, बैलजोड्या, दांडपट्टा ,लाठी ,लेझीम आणि झांज पथकांच्या कवायतीामुळे बेळगावकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

भांदूर गल्लीतील शिवजयंती मंडळाने नेताजी पाल्काराच्या शुद्धीकरणाचा प्रसंग सादर केला होता. जिजामाता चौक येथील शिवाजी कपाऊंडने सीमाप्रश्नाचा देखावा सादर केला होता. यावर्षीच्या चित्ररथ मिरवणुकीचे आकर्षण ठरले ते महाद्वार रोड येथील संभाजी गल्लीतील शिवजयंती मंडळाने सादर केलेला दक्षिण दिग्विजय देखावा.यय चारशेहून अधिक शिवभक्तांचा देखाव्याच्या सादरी करणात सहभाग होता.

हत्तीवर बसलेले शिवाजी महाराज ,उंटांची जोडी ,देखणे अश्व ,बैलगाडीवर सुरु असलेला सनई चौघडा, नऊवारी साडी नेसलेल्या मुलीनी हाती धरलेला भगवा ध्वज,सुहासिनी यामुळे देखावा पाहणार्‍याना काही काळापुरते तरी आपण शिवकालातच आहोत असे वाटल्यावाचून राहिले नाही. बेळगावकरांची महाराष्ट्रात सामील होण्याची जी ओढ आहे ही शिव जयंती चित्र रथ मिरवणुकीच्या माध्यमातून एकदा प्रकट केलेली आहे.

अनेक मंडळानी बेळगावकर मराठी जनतेवर कानडी सरकार द्वारा होणारे अन्याय आणि सीमा प्रश्नाचे ज्वलंत देखावे सादर केले. यात खंजर गल्लीतील मंडळाने बेळगावातील मराठी भाषिकांना वाघाची उपमा दिली होती आणि वाघ जरी पिंजर्‍यात असला तरी तो वाघच असतो असं म्हणत बेळगाव हे बेळगावच राहणार बेळगावी कधीच होणार नाही असं स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close