माऊली तू…,बछड्यांना वाचवण्यासाठी वाघिणीनं घेतला वारूळाचा आसरा !

April 28, 2015 9:53 PM0 commentsViews:

28 एप्रिल : वारुळात नाग असतो, वाळव्या, मुंग्या असतात, अशी आपली समजूत असते. पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.. वारुळातले वाघोबा. नागझिरातल्या एका वाघिणीनं आपल्या बछड्यांना वाचवण्यासाठी एक नामी शक्कल काढलीय.

जंगलचा राजा होणं हा काही पोरखेळ नाही आणि त्यातही या राजाच्या वारसदारांना जगवायचं असेल तर….बछड्यांना जगवायच्या या काळात वाघिणीला खूप दिव्यातून जावं लागतंय. अशाच दिव्यातून जाताना नागझिराच्या एका चाणाक्ष वाघिणीनं एक नामी शक्कल लढवलीय. आपल्या बछड्यांना तिनं एका वारुळामध्ये ठेवलंय. वाघिणीनं सगळ्यांपासून लपवलेलं हे एक मोठं रहस्य शोधून काढलंय. पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक डॉ. गुणवंत भेडके यांनी. त्यांनी काढलेल्या या बछड्यांच्या वारुळाचे फोटो पाहून व्याघ्रतज्ज्ञही अचंबित झालेत.

tiger_cubवाघीण जेव्हा बछड्यांना जन्म देते तेव्हा त्यांचे डोळेही धड उघडलेले नसतात. त्यानंतर दोनअडीच महिन्यांचा काळ तर खूपच धोक्याचा असतो. हे बछडे तरस, कोल्हे अशा जंगली प्राण्यांची शिकार होऊ शकतात. एवढंच नाही तर नर वाघांपासूनही त्यांना लपवून ठेवावं लागतं. कारण नर वाघ त्यांच्या साम्राज्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून या बछड्यांना ठार करतात. त्यामुळे वाघीण त्यांना कुणाच्याही नजरेला पडू देत नाही. ती त्यांच्या जागा सारख्या बदलत राहते.

याच कारणामुळे या वाघिणीनं तिच्या दोन बछड्यांना एका वारुळात ठेवलंय. त्याआधी तिने वारुळातली जमीन साफसूफ केलीय. त्याचबरोबर वारुळाचं पूर्वेकडचं जे छिद्र आहे त्या बाजूला तिने या बछड्यांना ठेवलंय. म्हणजे कोवळी सूर्यकिरणं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. शिवाय नागझिराच्या कडाक्याच्या उन्हापासूनही त्यांचं संरक्षण होतं. वारुळाची जमीन ओलसर असते आणि वारुळाजवळ हिरवी झाडंही असतात. त्यामुळे बछड्यांना सावलीही मिळते. हे सगळं तर झालंच पण हे वारुळ साप विंचवापासून सुरक्षित आहे ना..हेही या चाणाक्ष वाघिणीनं पडताळून पाहिलं असणार आणि मगच या बछड्यांना तिथे आणलं असणार.

नागझिराच्या या वाघिणीनं बछड्यांसाठी शोधलेलं हे तंत्र अफाट आहे. जंगलामध्ये वाघाच्या बछड्यांना आसरा ठरणारी अशी वारुळं अबाधित ठेवली तर वाघांच्या संवर्धनासाठी त्याची खूप मदत होणार आहे. उन्हाच्या तडाख्यात मृत्यू पावणार्‍या बछड्यांना वाचवण्यासाठीही हे तंत्र वापरता येईल, असं अभ्यासकांचं मत आहे.

 #वारुळातलेवाघोबा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close