प्रसिद्ध नाट्यसंस्था ‘सुयोग’च्या मालकी हक्काचा वाद कोर्टात

April 29, 2015 11:37 AM0 commentsViews:

suyog

29  एप्रिल : मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाट्यसंस्था सुयोगमध्ये सध्या वाद सुरू आहेत. आणि हे वाद आता कोर्टापर्यंत पोहचले आहेत. या नाट्यसंस्थेचे संस्थापक आणि प्रसिद्ध नाट्यनिर्माते सुधीर भट यांच्या निधनानंतर सुयोगचे दुसरे भागीदार गोपाळ अलगेरी यांनी सुयोगवर आपला हक्क दाखवला. सुधीर भट यांच्या पत्नी कांचन भट यांच्या म्हण्याप्रमाणे सुयोग ही संस्था सुधीर भट यांच्याच मालकीची असून अलगेरी संस्थेत 25 टक्केट भागीदार आहेत. तरीही सुधीर भट गेल्यानंतर अलगेरींनी सुयोग हडपल्याचा आरोप कांचन भट यांनी केला आहे.

सुधीर भट यांच्यानंतर या संस्थेचे मी आणि माझा मुलगा संदेश भट हेच कायदेशीर वारस आहोत असं कांचन भट यांचं म्हणणं आहे. तरीही सुधीर भटांच्या निधनानंतर गोपाळ अलगेरींनी जाणुनबुजुन कांचन भट यांना सुयोग संस्थेपासून दुर ठेवलं, शिवाजी मंदिर येथे असलेल्या सुयोगच्या कार्यालयातही कांचन भट आणि संदेश भट यांना येण्यास मज्जाव केला आहे. सुयोगच्या सध्या सुरू असलेल्या मोरूची मावशी आणि पुन्हा सही रे सही या नाटकांच्या प्रत्येक प्रयोगाचे फक्त एक हजार रूपये दिले जातात असा आरोप कांचन भट यांनी केला आहे. तसंच सुयोगमधील हिशोबही दाखवण्यात येत नाहीत. यामुळे कांचन भट आणि संदेश भट यांना प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कांचन भट यांनी 17 एप्रिलला गोपाळ अलगेरी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यावर गोपाळ अलगेरी यांनी नोटीसला उत्तर पाठवलं आहे. या वादाची सध्या नाट्यवर्तुळात चर्चा आहे. मोठ्या नाट्यसंस्थेतच वाद सुरू झाल्याने आता यात काय निकाल लागतो याकडे सगळ्या नाट्यकर्मीचं लक्ष लागलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close