शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण

April 30, 2015 10:54 PM0 commentsViews:

babasaheb purandre330 एप्रिल :ज्येष्ठ इतिहासकार, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्काराची घोषणा केलीय. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून 10 लाख रुपये रोख, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचं पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेल्या शिवचरित्रानं आपण भारावूनही गेलोय. त्यांचं जाणता राजा हे नाटकही गाजलं. बाबासाहेब पुरंदरे यांना हा सन्मान खूप आधीच मिळाला हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त होतेय. पण सगळ्यांनीच या घोषणेचं स्वागत केलंय. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठीच्या निवड समितीची नुकतीच बैठक झाली. या समितीने महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी एकमताने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची निवड केली. या समितीमध्ये चित्रकार वासुदेव कामत, पत्रकार राजीव खांडेकर, माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर, सरकारी वकील उज्ज्वल निकम, कीर्तनकार मंगल कांबळे, सांस्कृतिक कार्य सचिव वल्सा नायर-सिंह आणि सांस्कृतिक कार्य संचालक अजय आंबेकर यांचा समावेश होता. या समितीच्या निर्णयावर आज मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदरे यांचं अभिनंदन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजाचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याच काम केल्याबद्दल पुरंदरेंचा ‘महाराष्ट्रभूषण’ने सन्मान करण्यात आला अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली तसंच पुरंदरे यांच्या रुपानं अस्सल शिवभक्ताचा सन्मान झालाय असंही मुख्यमंत्री म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close