वाकोला पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठाची हत्या करून पोलिसाची आत्महत्या

May 3, 2015 12:17 PM0 commentsViews:

police killer03 मे : पोलिसांवरील कामाचा वाढता ताण आणि यातून होणार्‍या आपापसातील वादाच्या प्रकारांनी काल (शनिवारी) वाकोला पोलीस ठाण्यात धक्कादायक घटना घडली. न सांगता घेतलेल्या रजेची नोंद पोलीस ठाण्यातील डायरीत केल्याने संतापलेले एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिर्के यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी आणि त्यांचे ऑर्डर्ली बाळासाहेब अहेर यांच्यावर गोळ्या झाडून नंतर आत्महत्या केली.

दिलीप शिर्के यांनी शुक्रवारी न सांगता सुटी घेतली. या प्रकाराची नोंद रात्रपाळीच्या पोलीस निरीक्षकाने डायरीत केली. काल (शनिवारी) कामावर आल्यावर शिर्के यांना ही गोष्ट कळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जोशी यांना जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी. जोशी घरी जायला निघताच शिर्के यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. गोळी हाताला लागताच ते खाली कोसळले. ते उठण्याच्या प्रयत्नात असताच शिर्के यांनी झाडलेली दुसरी गोळी शरीरातून आरपार गेली. गोळय़ांचा आवाज ऐकून ऑडर्ली अहेर यांनी धाव घेतली तेव्हा त्यांनाही एक गोळी लागली. यानंतर शिर्के यांनी डोक्यावर गोळी झाडून घेतली.

शिर्के यांचा स्वभाव तापट होता, असे समजते. ते दोन-तीन महिन्यांनी निवृत्त होणार होते. त्यांना दोन मुले आणि मुलगी आहे. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी रात्री उशिरा घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, विलास जोशी यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close