शाळेत गैरहजर राहिल्याने शाळेतून काढलं!

May 3, 2015 5:54 PM0 commentsViews:

राहुल झोरी, आयबीएन लोकमत, मुंबई.

03 मे : कांदिवलीतल्या लोखंडवाला फाऊंडेशन शाळेत एक धक्कादायक प्रकार घडलाय. पाचवीत एक मुलगी शाळेत गैरहजर राहिल्यामुळे तिला चक्क बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. शाळेच्या या आडमुठ्या धोरणामुळे या मुलीची 2 वर्षं वाया गेली आहेत. तरीही शिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासनाला याचं काहीच देणंघेणं नसल्याचं दिसतंय. यासंदर्भात या मुलीचे पालक गेल्या 18 महिन्यांपासून लढत आहेत, मात्र अजूनही त्यांना न्याय मिळाला नाही.

डॉ विकास मोटेवार गेल्या 18 महीन्यांपासून त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी लढा देत आहेत. 2 वर्षापुर्वी काही महत्त्वाच्या कारणांमुळे डॉं मोटेवार यांना मुंबईच्या बाहेर राहावं लागलं. मुंबईत कुणीही जवळचं नसल्यामुळे या काळात त्यांची मुलगी दुर्वा शाळेत जाऊ शकली नाही. याबद्दल डॉ मोटेवारांनी शाळेच्या संपर्कात राहुन सगळी हकीगत सांगितली होती. शाळेची फीही भरली होती. मात्र मुंबईत परत आल्यावर शाळा प्रशासनानं दुर्वाला वर्गामध्ये घ्यायला नकार दिला.

लोखंडवाला फाउंडेशन शाळेने दुर्वाला पाचवीची परीक्षा देऊ दिली नाही. सहावीसाठी प्रवेशही दिला नाही. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासुन ती शाळेत गेली नाहीय. दुर्वाला पाहताच सुरक्षारक्षक शाळेचे गेट्स बंद करतात, असा दावा दुर्वाच्या पालकांनी केला आहे. मात्र गेल्या 2 वर्षांपासून शाळेची पायरीही न चढलेली दुर्गा अजिबात खचलेली नाहीय. ही धीट मुलगी मैत्रीणींच्या मदतीनं घरीच अभ्यास करते.

शिक्षण अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाबरोबरच शिक्षण हक्क कायद्यालाही शाळा प्रशासनानं केराची टोपली दाखवलीय. मात्र तरीही याविरोधात शाळेवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीय. या संदर्भात शिक्षण अधिकारी आणि शाळा प्रशासन यांच्याशी संपर्क केला असता यावर कोणतीही प्रतिक्रीया द्यायला नकार दिला. मुलगी शिकली, प्रगती झाली. असा नारा देत मुलींच्या शिक्षणासाठी हजारो कोटी खर्च करणारं सरकार या मुलीकडे लक्ष देईल का?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close