आयबीएन लोकमतचा निवडणूक सर्व्हे खरा ठरला.

October 22, 2009 3:18 PM0 commentsViews: 22

मुंबई – आयबीएन लोकमतने 'महाराष्ट्राचा कल कुणाकडे ' हा मतदानोत्तर सर्व्हे खरा ठरला. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही आयबीएन लोकमतनं वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला – 135 ते 145 जागा, शिवसेना आणि भाजपला 105 ते 115 जागा, मनसेला 8 ते 12 जागा, तिसरी आघाडी आणि अपक्षांना मिळून एकूण 25 ते 35 जागा मिळतील असा अंदाज 'आयबीएन लोकमत'नं वर्तवला होता. या सर्व्हेत नोंदवण्यात आलेलं पक्षनिहाय बलाबल असं होतं- काँग्रेस 75 ते 85 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 55 ते 65 जागा, तर शिवसेनेच्या खात्यात 45 ते 55 जागा जातील असं आयबीएन लोकमतच्या सर्व्हेत म्हटल ंहोतं. तसंच भाजप 45 ते 55 तर मनसेला 8 ते 12 जागा मिळतील, असंही या अंदाजात सांगण्यात आलं होतं. विधानसभा निवडणुकीचा गुरुवारी निकाल जाहीर झाल्यानंतर, पुढं आलेली आकडेवारी आयबीएन लोकमतनं केलेल्या सर्व्हेला जुळणारी होती, यावरुन पुन्हा प्रेक्षकांसमोर आयबीएन लोकमतची विश्वासार्हता सिद्ध झाली आहे. अर्थात 'अचूक बातमी ठाम मत' या आपल्या ब्रीद वाक्याला साजेसा अंदाजच आयबीएन लोकमतनं आपल्या सर्व्हेमध्ये व्यक्त केला होता. हा सर्व्हे आयबीएन 18 चे संपादक राजदीप सरदेसाई, आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर, डॉ. अशोक चौसाळकर आणि वरिष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

close