जीएसटी आणि रिअल इस्टेट विधेयकावरून सरकारची लागणार कसोटी?

May 5, 2015 12:43 PM0 commentsViews:

GST-FEATURE

05 मे : जीएसटी विधेयक आज लोकसभेत चर्चेसाठी सादर करण्यात येणार असून, हे विधेयक मंजूर करण्याचे कडवे आव्हान सरकारपुढे असणार आहे. दरम्यान, या विधेकाला मंजुरी मिळाल्यास देशात लावण्यात येणारे सर्व कर रद्द होऊन फक्त वस्तू आणि सेवा कर या नावाचा एकच कर लागू करण्यात येणार आहे.

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गेल्यावेळी या विधेयकावरच्या चर्चेला सुरूवात केली होती. आज पुन्हा लोकसभेत या विधेकावर चर्चा करण्यात येणार आहे. हे विधेयक घटना दुरूस्तीचे असल्याने त्याच्या मंजुरीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र, काँग्रेससह अन्य विरोधक पक्षांच्या आक्रमक पवित्र्याने हे विधेयक मंजूर करणं सरकारपुढे आव्हान असणार आहे. दरम्यान, जीएसटी विधेकाच्या मंजुरीसाठी विरोधी पक्षांचे सहकार्य मिळाले, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

तर राज्यसभेमध्ये रिअल इस्टेट विधेयकावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या विधेयकाला विरोध करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. दरम्यान, हे विधेयक विशेष समितीकडे पाठवायला सरकार तयार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हे विधेयक बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी आहे आणि सामान्यांचा यात तोटा होणार असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. या विधेयकात एका प्रकल्पातून दुसर्‍या प्रकल्पासाठी वापरल्या जाणार्‍या पैशांच्या सुरक्षित वापराबद्दल कोणतीही खात्री नसल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. या शिवाय, नेट न्युट्रॅलिटीच्या मुद्द्यावर आज राज्यसभेत चर्चा होणार आहे. तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन लक्षवेधी मांडतील, आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद त्यावर उत्तर देतील, अशी अपेक्षा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close