सारे करून भागले पण जेलचे दार उघडलेच !

May 6, 2015 9:39 PM0 commentsViews:

salman khan_67989006 मे : बहुचर्चित फुटपाथ प्रकरणी अभिनेता सलमान खानला सेशन्स कोर्टाने अखेर शिक्षा सुनावली. सलमानवरील सदोष मनुष्यवधाचा आरोप कोर्टाने ग्राह्य धरत कोर्टाने त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावलीय. पण या खटल्यातून वाचवण्यासाठी सलमानने आतापर्यंत नेमकं काय काय केलंय. कोणाकोणाचे उंबरे झिजवले पाहा हा विशेष वृत्तांत….

मुंबई बॉम्बस्फोटातून सुटण्यासाठी संजूबाबाने जसे ‘मातोश्री’चे उंबरे झिजवले होते. त्याप्रमाणे सल्लूमियाँने देखील फुटपाथ अपघात प्रकरणातून सहिसलामत सुटण्यासाठी हर तर्‍हेचे प्रयत्न करून पाहिलेत. अगदी बिईंग ह्युमन बनण्यापासून ते थेट राजकीय नेत्यांचेही उंबरे झिजून पाहिले. पण सगळं व्यर्थ गेलं. कायद्यासमोर सगळे सारखेच असतात हे तत्व सार्थ ठरवत कोर्टाने सलमानला 5 वर्षांची शिक्षा ही सुनावलीच.

सलमानविरोधात गुन्हा दाखल

2002 सालच्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातून सहिसलामत सुटण्यासाठी सलमान विरोधातली ही केस तब्बल 13 वर्षे कोर्टात रेंगाळली.प्रारंभी तर हा खटला एका साध्या अपघाताप्रमाणेच चालवला गेला. पण सामाजिक कार्यकर्त्या हायकोर्टात गेल्यानंतर याच प्रकरणात सलमानवर नव्याने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. तेव्हा कुठे सलमानविरोधातला खटला पोलीस आणि सरकारच्यावतीने गांभिर्याने चालवला गेला.

सलमान नरमला

प्रत्यक्षदर्शीची साक्ष विरोधात गेल्यानंतर सलमानने स्वतःची बॅड बॉयची इमेज सुधारण्यासाठी काय काय नाही केलं. सर्वात आधी तो मीडियाशी अतिशय नम्रपणे वागू लागला. करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या शोमध्येही त्याने हजेरी लावली.एवढंच नाहीतर 2007 साली त्याने ‘बिईंग ह्युमन’ ही स्वयंसेवी संस्थाही स्थापन केली आणि त्याद्वारे गरजूंना तब्बल 42 कोटी रूपयांचे दान केलं. याच काळात सलमानच्या ‘बिईंग ह्युमन’ टी-शर्टची फॅशन भलतीच लोकप्रिय झाली. आणि सलमान पुन्हा यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला.

मोदींसोबत पंतगबाजीही करून पाहिली

लोकसभा निवडणुकीत सलमान थेट मोदींच्या गुजरातमध्ये जाऊन पोहोचला. तिथे त्यांने मोदींसोबत पतंगबाजीही केली. विशेष म्हणजे त्यावेळी बहुतांश मुस्लीम समाज मोदींवर 2002च्या दंगलीमुळे नाराज होता. तरीही सलमानने मोदींसोबतचे मैत्रीचे संबंध कायम ठेवले.

राज ठाकरेंसोबत मैत्री वाढवली
सलमानने फक्त मोदींसोबतच रिलेशन वाढवले नाहीतर मनसेच्या कोळी फेस्टिव्हलमध्येही हजेरी लावली. राज ठाकरे यांनी मुंबई डीपीवर बोलावलेल्या हायप्रोफाईल परिसंवादालाही आवर्जून हजेरी लावली. राजसोबत स्टेजही शेअर केलं. एकूणच ड्रंक अँड ड्राईव्हच्या गुन्ह्याबाबत जनमानसात आपल्याविषया सहानूभूती निर्माण व्हावी. यासाठी सलमानने हरतर्हेचे प्रयत्न केले.

खोटू बोलूनही पाहिलं
ड्रंक ड्राईव्हच्या गुन्ह्यात निर्दोष सुटता यावं यासाठी सलमाने चक्क ड्रायव्हर अशोक सिंहला बळीचा बकरा बनवून पाहिलं. त्याने मालकावरची श्रद्धा सिद्ध करण्यासाठी चक्क कोर्टातच खोटी साक्ष दिली. अपघातावेळी मीच गाडी चालवत होतो. असा दावा अशोक सिंहने केला. सलमानने देखील आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावले आणि आपल्याला या प्रकरणात विनाकारण गोवलं जात असल्याचा कांगावा केला. हे कमी की काय म्हणून या अपघातातील पीडितांनी माध्यमांसमोर सलमानला परस्पर जाहीर माफी देऊन टाकली. थोडक्यात कोर्टाचं मतपरिवर्तन व्हावं. आपल्याविषयी न्यायव्यवस्थेच्या मनात सहानूभूती निर्माण व्हावी यासाठी सलमाने कोर्टावर चोहीबाजुंनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण सरकारी पक्षाने त्याचा प्रयत्न हाणून पाडला.

निर्दोष सुटण्यासाठीचे सर्व प्रयत्न करूनही कोर्टाने सरकारी पक्षाने सादर केलेले सारे पुरावे ग्राह्य धरले आणि आणि अखेर सलमान या प्रकरणात दोषी धरलंच. त्यानंतरही शेवटचा प्रयत्न म्हणून शिक्षा कमी करण्यासाठी सलमानच्या वकिलांनी त्यांच्या दानशूरपणाचे आणि बिईंग ह्युमन असल्याचे दाखले कोर्टासमोर सादर केले आणि कमीतकमी शिक्षा देण्याची याचना केली. पण सलमानचे हे सारे प्रयत्न निष्फळ ठऱले आणि कोर्टाने अभिनेता सलमानला ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा आणि 25 हजारांचा दंड ठोठावलाय. कोर्टाच्या या निर्णयाने बॉलीवूड हळहळलं असलं तरी जनसामान्यांमधून स्वागतच होतंय. कारण कायदा हा सर्वांसाठी समानच असतो. हे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close