जितेंद्र आव्हाड आता शिवशाहिरांची जाहीर माफी मागणार का ?

May 7, 2015 11:27 PM0 commentsViews:

awahad vs balkavade07 मे : आयबीएन लोकमतच्या बेधडक या चर्चात्मक कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेलिखित शिवचरित्राबाबत काही गंभीर आरोप केले होते. त्याला इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी थेट पुरावे सादर करूनच प्रत्युत्तर दिलंय. म्हणूनच आव्हाडांनी जाहीर केल्याप्रमाणे ते शिवशाहिरांची जाहीर माफी मागणार का ?, असा थेट सवाल बलकवडेंनी उपस्थित केलाय.

शासनाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषणचा पुरस्कार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जाहीरपणे आक्षेप घेतला होता. जनमानसातही त्याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या म्हणूनच आम्ही या संवेदनशील विषयावर सोमवारी बेधडक कार्यक्रम घेतला. त्यात जितेंद्र आव्हाडांनाही आवर्जून बोलावलं. पण, त्यांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवचरित्रावर गंभीर आक्षेप घेतले त्यावर इतिहासकार बलकवडेंनी त्याला थेट शिवकालीन पुरावेच सादर करून आव्हाडांना प्रत्यत्तर दिलंय.

शिवचरित्रात माँ जिजाऊंना कुंती म्हटल्याबद्दलही आव्हाडांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यालाही इतिहासकार बडकवडेंनी शिवकालीन पोवाड्याचा संदर्भ देऊनच प्रत्युत्तर दिलंय.आव्हाडांचा दुसरा गंभीर आरोप आणि बलकवडेंनी त्याला पुराव्यासह प्रत्युत्तर दिलं.

इतिहासकार बलकवडेंनी शिवचरित्रासंबंधीचे आरोप पुराव्यासह खोडून काढले तर आपण शिवशाहिरांची जाहीर माफी मागू, असं आव्हांडांनी जाहीर केलं होते. म्हणूनच आता शिवकालीन पुरावे सादर केल्यानंतर तरी जितेंद्र आव्हाड बाबासाहेबांची जाहीर माफी मागणार का असा थेट सवाल बलकवडेंनी उपस्थित केलाय. यासोबतच कुणबिणींच्या विक्रीच्या नोंदीवरून आव्हाडांकडून जो काही गोंधळ घालण्याय येतोय त्यालाही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावतीनेही स्वतंत्र प्रेट नोट प्रसिद्ध करून प्रत्युत्तर देण्यात आलंय.

ते असं….
कुणबिणी विक्रीच्या या नोंदी शिवजन्मपूर्व काळातल्या मोगलाईत घडलेल्या असून त्या
आंग्रे पत्रव्यवहार,
शिवचरित्र साहित्य 4/724(पत्र),
चिटणीस घराण्याचा संदर्भ ग्रंथ पृष्ठ क्रमांक 23,
भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैवार्षिक वर्ष 8वे
 अंक 3 रा, पृष्ठ 140 वरील निबंध यामधला असून कुंतीसंदर्भातला उल्लेख हा चित्रगुप्त बखर (पान क्र. 23) मध्ये आढळतो.

आव्हाड आणि कोकाटेंनी हे सारे इतिहासकालीन संदर्भ आवर्जून अभ्यासावेत असंही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्यावतीने स्पष्ट करण्यात आलंय. म्हणूनच आता जितेंद्र आव्हाड जाहीर केल्याप्रमाण खरंच बाबासाहेब पुरंदरेंची जाहीर माफी मागणार का हेच पाहायचंय.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close