रिव्ह्यु : सहजसुंदर मांडणीचा ‘पिकू’

May 8, 2015 10:25 PM1 commentViews:

अमोल परचुरे, समीक्षक

‘विकी डोनर’ आणि ‘मद्रास कॅफे’ या अप्रतिम सिनेमांनंतर शुजित सरकार या दिग्दर्शकाने ‘पिकू’ हा सिनेमा सादर केलेला आहे. ‘पिकू’ या सिनेमात शूजीत सरकारने कास्टिंगमध्येच बाजी मारलीये. इरफान खान, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन अशी स्टारकास्ट एकत्र जमवून शुजीतने आधीच बाजी मारलीये असं म्हणता येईल. वडील आणि मुलीच्या नात्याची ही एकदम जगावेगळी गोष्टही तुम्हाला वाटू शकेल. ‘विकी डोनर’मध्ये सुद्धा एक बंगाली फॅमिली होती, आणि बंगाली सुखवस्तू घरांमध्ये असलेले मोकळेढाकळे संवादही आणि मोकळं वातावरणही त्यात दिसलं होतं. त्यात विकी डोनरचा विषय शुक्रजंतूंविषयी होता, तर पिकूमध्ये जगभरात आढळणारी आरोग्याची समस्या दिसते. पोट साफ नसलं की, आयुष्यभरासाठी मोशनचा जो प्रॉब्लेम होतो तो यात केंद्रस्थानी आहे असंही म्हणता येईल. आपल्या पित्याचा बद्धकोष्ठता हा प्रॉब्लेम, त्यांची औषधं, त्यांचा विक्षिप्तपणा हे सगळं सोबत घेऊन आयुष्य जगणारी एक मुलगी पिकू… तिचा हा सिनेमा आहे.

काय आहे स्टोरी ?

piku3-apr1हृषिकेश मुखर्जी यांच्या सिनेमांची आठवण व्हावी असा हा सिनेमा आहे. हृषिकेश मुखर्जी यांच्या सिनेमांमध्ये साधेपणा होता, गोडवा होता अगदी तशीच सादगी पिकूमध्ये आहे. एक बंगाली फॅमिली आपल्यासमोर बसून बोलतेय, भांडतेय असं वाटावं इतकी सिनेमाची मांडणी सुंदर आहे. कोणत्याही सुखवस्तू भारतीय घरात वयोपरत्वे आलेली आजारपणं आणि त्यातून मार्ग काढत जगणारी पुढची पिढी हे चित्र जसं असेल, जसं दिसेल अगदी तसंच ते सिनेमात दाखवण्यात आलेलं आहे. उगीच फिल्मीपणा नाही, फिल्मी संवाद नाहीत हेच सिनेमाचं वैशिष्टय आहे. नेहमी सिनेमात कथा महत्त्वाची असते पण पिकूमध्ये मांडणी, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय आणि जुही चतुर्वेदीची पटकथा यांची कामगिरी अफलातूनच झालेली आहे. शुजीत सरकारने प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यावर भर दिलाय, पण त्यासाठी काहीतरी अफलातून वगैरे फ्रेम्स लावल्यायत, पार्श्वसंगीताचा मारा केलाय असल्या गोष्टी नाहीयेत याचंच कौतुक वाटतं.

नवीन काय ?

piku13-apr1पिकूचा क्लायमॅक्स किंवा सिनेमाचा शेवट हा अपेक्षितच असतो, शेवट काय होणार याचा अंदाजही आपण केलेला असतो, तरीही आपण शेवटपर्यंत एक नितांतसुंदर सिनेमा अनुभवत राहतो. प्रत्येक भावना ही बोलूनच दाखवावी लागते असं अजिबात नाही. आपल्याकडे बर्‍याचदा उलटं दिसतं, वाचाळ सीन्स दिसत राहतात, पण त्या सगळ्याला काट मारुन शुजीत सरकारने इरफान, दिपिका आणि अमिताभ यांच्यातील अनेक प्रसंग खूप छान फुलवलेले आहेत. तंत्राचा नीटनेटका वापर करुन सिनेमाचा वेग, सिनेमाचा मूड हा एकसारखा ठेवलेला आहे.

परफॉर्मन्सpiku11-nov9

अभिनयाबद्दल बोलायचं तर दिपिका पदुकोण हिचं विशेष कौतुक करावं लागेल. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींनी जाणीवपूर्वक आता हा विचार आणि कृती करायला सुरुवात केलीये, नुसतं हिरोच्या मागे मागे नाचण्यापेक्षा मिनिंगफुल भूमिका करण्यावर त्यांचा भर आहे. दिपिका पदुकोणने गेल्यावर्षीसुद्धा फाईंडिंग फॅनीसारख्या सिनेमात काम केलं, आणि हॅपी न्यू ईयर सारखे सिनेमे केल्यानंतरही पिकूसारख्या सिनेमात अमिताभ बच्चन आणि इरफानसारख्या तगड्या कलाकारांसमोर अतिशय सहजपणे काम केलेलं आहे. इरफान तर सदाबहार आहेच. हैदरमधला त्याचा रोल एकदम वेगळा होता, आणि पिकूमधला राणा चौधरी हा खूपच वेगळ्या प्रकृतीचा आहे, पण इरफानने दिपिकाच्या हिरोच्या रोलमध्ये खरंच कमाल केलेली आहे. दि ग्रेट अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलू तेवढं कमी…शमिताभमध्ये आपण त्याची अदाकारी पाहिली आणि पिकूमध्ये त्यांनी केलेली भूमिका कमालीच्या पद्धतीने साकारल्यात. अमिताभची भूमिका या सिनेमाचं खास आकर्षण आहे.

रेटिंग 100 पैकी 80

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • akash

    ok movies is nice

close