काळबादेवी आगीच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

May 10, 2015 6:59 PM0 commentsViews:

CM on Fire

10 मे : अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा बळी घेणार्‍या काळबादेवी इथल्या भीषण आगीची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. या जवानांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

काळबादेवी इथल्या गोकुळ निवासाच्या इमारतीला काल भीषण आग लागली होती. ही आग अटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात अग्निशामक दलाचे संजय राणे आणि महेंद्र देसाई या दोन अधिकार्‍यांचा बळी गेला. आज या दोन्ही शहीदांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याच दुर्घटनेत आणखी दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना एरोलीतील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त होत असताना आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी आगीची गंभीर दखल घेतली आहे. कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि या आगीच्या सखोल चौकशीचे आदेश दिलेत. राज्य सरकार जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील, असा विश्वासही त्यांनी दिलाय.

मुख्यमंत्र्यांच्या या पत्रकानंतर, काळबादेवी दुर्घटनेत शहीद झालेल्या अग्निशमन अधिकार्‍यांना त्यांची सर्व देणी सात दिवसांत देण्यात येतील आणि जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार सुविधा पुरवण्यात येतील, असं मुंबई महापालिकेनं जाहीर केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close