बालकामगार कायद्याचे तीनतेरा ; 14 वर्षांखालील मुलांना काम करायला परवानगी

May 13, 2015 5:23 PM0 commentsViews:

child labour13 मे : एकीकडे बालकामगारांचं शोषण होऊ नये म्हणून गळा काढला जातो. पण, आता 14 वर्षांखालील मुलांना धोका नसलेल्या गृहउद्योगांमध्ये काम करायला केंद्र सरकारने परवानगी दिलीये. 1986 बालकामगार विरोधी कायद्यात ही नवी सुधारणाही करण्यात आलीये. मात्र, या सुधारणेला बालहक्क कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे.

14 वर्षांखालील मुलांना काम करण्याची परवानगी देणारी सुधारणा नुकतीचं केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलीये. बालकामगार प्रतिबंधक आणि नियमन कायद्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं सुधारणांना मंजुरी दिलीये. त्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलंय. या सुधारणेनुसार 14 वर्षांखालच्या मुलांना कुटुंबाला मदत करण्यासाठी कौटुंबिक व्यवसायात धोकादायक नसलेल्या परिस्थितीत काम करण्यासाठी परवानगी देण्यात आलीये.

फक्त सुट्टीच्या काळात किंवा शाळेच्या वेळेनंतरच काम करण्यासाठी परवानगी असेल. 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना शिक्षण मिळावं यासाठी कामगार कायदा आणि शिक्षणहक्क कायद्यात मेळ घालण्याच्या दृष्टीनं हे पाऊल उचललं असल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

संसदीय अधिवेशनाच्या पुढच्या सत्रात हे विधेयक सादर करण्यात येईल. पण बालहक्कांसाठी काम करणार्‍यांनी या सुधारणेला विरोध केलाय. कायद्यातली ही सुधारणा देशाला मागे घेऊन जाईल आणि या कायद्यामुळे लहान मुलांचं व्यावसायिकपणे उघड शोषण करता येईल, असा आरोप त्यांनी केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close