शाब्बास सुनबाई, ‘ती’ने लग्नात आंदण म्हणून मागितला शौचालय !

May 16, 2015 4:22 PM0 commentsViews:

akola news3316 मे : भौतिक सुखाच्या कोणत्याही वस्तूची मागणी न करता ग्रामीण भागात राहणार्‍या उपवर मुलीने आंदण (लग्नातील भेट वस्तू) म्हणून शौचालय मिळावे, असा आग्रह धरून स्वच्छतेचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. तिच्या या स्तुत्य पायंड्याला कुटुंबीयांनीही सकारात्मक प्रतिसाद देत तिला आंदणात रेडिमेड शौचालय देण्यात आला. हा लग्नसोहळा 15 मे रोजी अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे थाटामाटात पार पडला.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘जहौं सोच वहौं शौचालय’ हे घोषवाक्य आचरणात आणणार्‍या या उपवर मुलीचे नाव आहे चैताली दिलीप गाळखे. केंद्र सरकारतर्फे सध्या स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत उघड्यावर शौचास न बसता शौचालय बांधण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका महिलेने सौभाग्याचे लेणं असलेलं मंगळसूत्र गहाण ठेवून शौचालय बांधले होते. हे स्फूर्तिदायक उदाहरण ताजे असतानाच आता आंदणात शौचालय मिळण्यासाठी मुलीने आग्रह धरल्याचे समोर आले आहे. दिलीप वासुदेवराव गाळखे यांच्या चंदा या मुलीचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील मोजर येथील देवेंद्र माकोडे यांच्याशी 15 मे रोजी बाळापूर तालुक्यातील नया अंदुरा येथे संपन्न झाला. उपवर मुली लग्नात टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन इत्यादी भौतिक गरजेचे साहित्याची मागणी पित्याकडे करतात. मात्र, सासरी शौचालय नसल्याचे माहित होताच. चैतालीने इतर वस्तूंची मागणी न करता, शौचालयाची मागणी केली. आणि तिच्या ह्या हट्टाला कुटुंबानेही हसत हसत मान्य केलं. आणि रेडीमेड शौचालय भेट म्हणून दिलं. चैतालीच्या लग्नात आलेल्या कुमारीकांनाही चैतालीचा निर्णय योग्य वाटल्याने, त्यांच्या विवाहवेळी सासरी शौचालय नसल्यास भेट म्हणून शौचालायचीच मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. चैतालीच्या निर्णया प्रमाणे सर्वच मुलींनी शौचालायची मागणी केल्यास, प्रत्येक गावं हागणदारी मुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close