सिंचन घोटाळ्याची चौकशी तडीस नेऊ – मुख्यमंत्री

May 20, 2015 7:29 PM0 commentsViews:

devendrtaari;jionsen20 मे : सिंचन घोटाळ्यासह राज्यातील सर्व घोटाळ्यांची चौकशी तडीस नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या चौकशीत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप करणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं आहे. तसंच, भाजप आणि शिवसेनेत कोणत्याही प्रकारचा विसंवाद नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य सरकारला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. कालच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एसीबीने दुसर्‍यांदा समन्स बजावलं होतं. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी तडीस नेऊ, असं आश्वासन दिलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत नागपूर आणि पुण्यात IIIT स्थापन करण्याच निर्णय घेण्यात आला. तसंच आत्महत्याग्रस्त भागात व्हॅल्यू चेन सिस्टिममधून उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर कारखाने अधिनियमातही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. ओव्हर टाईमसाठी कंपनी व्यवस्थापन पूर्वपरवानगीची अट रद्द करण्यात आलीय. महिला कामगारांना रात्री काम करण्याची मुभा दिली जाणार आहे. भरपगारी रजेसाठी दिवसांची मर्यादा आता 90 दिवसांवर आणली आहे. अमरावती आणि यवतमाळमध्ये टेक्सटाईल झोन उभारण्याचा निर्णय घेतल्याचंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

राज्यात नवं गृहनिर्माण धोरण तयार करण्यात येत असून, यावर आमदार आणि खासदारांची मतं मागविण्यात आली आहेत. शिवसेना-भाजपात कोणतेही मतभेद नाहीत. आमच्यात विविध मुद्यांवर संवाद होत असतो. एखाद्या मुद्यावर मत व्यक्त करणे म्हणजे वाद नाही, अशी सारवासारव मुख्यमंत्र्यांनी केली. आमचा कारभार सुरळीत चालला असून, याबाबत कुणी काळजी करू नये, असा टोला त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.

धातू व्यावसायिकांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल

गुजरातमध्ये व्यवसाय हलवण्याचा इशारा देणार्‍या मुंबईतल्या धातू उद्योजकांना मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले आहेत. अदानींना गुजरातमध्येच व्यवसाय करायचा आहे का, महाराष्ट्रात करायचा नाही का, असा टोला त्यांनी धातू व्यावसायिकांना लगावला. व्यापार्‍यांच्या मुद्द्यांची दखल घेऊ, पण कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. करांविषयीची व्यापार्‍यांची जी तक्रार आहे, ती कायदेशीर बाब आहे. त्यामुळे त्यावर कायदेशीरच तोडगा काढू. त्यात बेकायदेशीर कुठलीही गोष्ट राज्य सरकार करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पण, व्यापार्‍यांच्या इतर मागण्यांवर नक्कीच सकारात्मक विचार करू, असंही त्यांनी सांगितलं.

झगडेंच्या बदलीबद्दल मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

परिवहन आयुक्त महेश झगडे यांची नुकतीच पीएमआरडीएच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली. आरटीओवर कारवाई करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळेच त्यांची बदली झाल्याच्या बातम्या त्यावेळी आल्या होत्या. पण, नव्याने स्थापन झालेल्या पीएमआरडीएची धुरा सांभाळण्याची इच्छा खुद्द झगडे यांनीच व्यक्त केली होती. त्यानुसारच त्यांना बदली देण्यात आली, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close