वेळ पडल्यास सरकारला बाहेरून पाठींबा : राष्ट्रवादीची भूमिका

November 3, 2009 9:09 AM0 commentsViews:

3 नोव्हेंबर खातेवाटपात एकमत होत नाही, तोपर्यंत सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ, असं राष्ट्रवादीतर्फे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यपालांना भेटल्यानंतरही खातेवाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीतला वाद संपला नसल्याचं स्पष्ट झालंय. राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 12 दिवस झाले. तरीही सरकार स्थापन न झाल्याने राज्यपालांनी मंगळवारी काळजीवाहू मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना राजभवनात बोलावलं होतं. त्यानंतर छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. गेल्या विधानसभेत 1 जागा कमी मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला 21 आणि काँग्रेसला 22 मंत्रीपदं असा फॉर्म्युला मांडला होता. तेव्हा काँग्रेसने तो मान्यही केला होता. काँग्रेसने 1999 चं सूत्र पाळावं असंही भुजबळांनी यावेळी सांगितलं. आपण काँग्रेसकडे कोणत्याही खात्यांची मागणी केली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला तब्बल 20 जागा जास्त मिळाल्याने महत्वाच्या खात्यांसह पूर्वीपेक्षा जास्त मंत्रीपदं हवी आहेत. काँग्रेसनं नरमाईची भूमिका घेत राष्ट्रवादीला 21-22चा फार्म्युला ऑफर केल्याचं समजतं. त्यानुसार राष्ट्रवादीला 20 मंत्रीपदं, तर काँग्रेसला मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त आणखी 22 मंत्रीपदं मिळू शकतात. पण राष्ट्रवादी 1999च्या फार्म्युलावर अडून बसली आहे. म्हणजे दोन्ही काँग्रेसला 21-21 अशी मंत्रीपदं मिळावीत अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. अंतिम तोडगा निघेपर्यंत पाठिंब्याचं पत्र राज्यपालांकडे द्यायचं नाही, असं राष्ट्रवादीनं ठरवलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी गृह, अर्थ आणि उर्जा खातं सोडण्यासाठी तयार आहे. पण ग्रामविकास, आदिवासी विकास ही खाती काँग्रेसला हवी आहेत. तर राष्ट्रवादीने नगरविकास, समाजकल्याण खात्यासाठी आग्रह धरला आहे.

close