देशभरात उष्मघाताने 430 तर विदर्भात 6 जणांचा मृत्यू

May 25, 2015 2:57 PM0 commentsViews:

GARMI

25 मे : गेल्या काही दिवसांपासून विदर्भ मराठवाड्यात सूर्य आग ओकतोय. चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि नागपूरमध्ये पारा चांगलाच चढला आहे. काही आठवडयांपासून तापमानानं 45 अंशाचा पारा ओलांडल्यानं नागरिकांची लाही लाही होतीय. गेल्या दोन दिवसांमध्ये उष्माघाताने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. वाशीममध्येही उष्मघाताने एका 50 वर्षांच्या पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे.

राज्यातचं नाही तर देशभरात उन्हाचा कडाका वाढलेलाच दिसतोय. अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. उष्माघातामुळे आतापर्यंत आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये 430 जणांचा बळी गेलाय. तर आंध्रात काल 47 अंश इतकं उच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. ओडिशामध्ये 26 बळी गेलेत तर उत्तर प्रदेशातील अलाहबादमध्ये 47.7 अंश तापमान होतं. काल दिल्लीतही या उन्हाळ्यातलं उच्चांकी म्हणजे 44.5 अंश इतकं तापमान नोंदवलं गेलं.

अवकाळी आणि गारपिटीने विदर्भात यंदा उन्हाच्या झळा कमी जाणवल्या होत्या. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भाच्या तापमानात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. यंदाच्या मोसमात वर्ध्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरचा पारा आज 47 अंशावर पोहचला असून त्याखालोखाल ब्रम्हपुरी 45.3, वर्धा 45.2, नागपुरात 44.9 अंश तापमानाची नोंद झाली. रात्रीचही तापमान 30 अंशाच्या जवळपास राहत असल्याने गारवा निर्माण होत नाहीय. सतत वाढणार्‍या तापमानामुळे लोकं घरातचं बसणं पसंत करत असून त्यामुळे रस्ते ओस पडले आहेत. या उन्हामुळे कुलर, पंखे, एसीसुद्धा कुचकामी ठरत आहे. तर अंगात वाढलेला उष्म्याचा दाह कमी करण्यासाठी ज्यूस किंवा थंड पेये घेण्यासाठी लोकांचा कल वाढताना दिसतोय.

राज्यात पारा चढला

चंद्रपूर 47 अंश सेल्सियस
नागपूर 44.9 अंश सेल्सियस
वर्धा 45.2 अंश सेल्सियस
ब्रम्हपुरी 45.3 अंश सेल्सियस

मराठवाडा
औरंगाबाद 40.4 अंश सेल्सियस
नांदेड – 44 अंश सेल्सियस
मुंबई – 36.2 अंश सेल्सियस
रत्नागिरी 34.6 अंश सेल्सियस
पुणे 35.6 अंश सेल्सियस
जळगाव 43.2 अंश सेल्सियस
महाबळेश्वर 28.8 अंश सेल्सियस
सोलापूर 41.5 अंश सेल्सियस

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close