‘आप’चे वादमय 100 दिवस पूर्ण !

May 25, 2015 4:18 PM0 commentsViews:

25 मे : आम आदमी पक्षाच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या 100 दिवसांच्या काळात आपची कामगिरी म्हणजे ‘थोडा है, थोडे की जरूरत है’, अशी म्हणावी लागेल. जनतेची कामं होतायत, नक्की पण ज्या गतीने आश्वासनं दिली गेली, त्या गतीने कामं होत नाहीयेत, असं जनतेचं म्हणणं आहे.

14 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील जतंरमंतरवर शपथविधीचा सोहळा झाला होता. या 100 दिवसांत केजरीवाल सरकारने दिल्लीकरांच्या मुख्य समस्यांवर लक्ष केंद्रीत करत जनतेला दिलेली काही आश्वासनं पूर्णही केली. विजेचे दर 50 टक्क्यांनी कमी केले, प्रत्येक घराला 20 हजार लीटर पाणी मोफत दिलं, अनधिकृत वस्त्यांमध्ये कारवाई थांबवली, शेतकर्‍यांना 50 हजार रु. प्रति हेक्टरची मदतही दिली, तरीही केजरीवाल सरकार वादातच राहिली.

केजरीवाल सरकारला सर्वात आधी दिल्ली पोलीस आणि दिल्ली सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या अख्त्यारीचा वादाला सामोरं जावं लागलं आणि त्यानंतर केजरीवालांनी काढलेलं मीडियावर मानहानीचे दावे ठोका, असं सांगणारं परिपत्रक. या परिपत्रकाला सुप्रीम कोर्टानेही स्थगिती दिली.

पण, केजरीवाल सरकारचे वादाच्या भौवर्‍यातून काही सुटेना…आता गाजतोय, तो प्रशासकीय नियुक्त्यांचा मुद्दा. यावरचे नायब राज्यपालांशी केजरीवालांचा असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. जंग यांनी नेमलेल्या हंगामी मुख्य सचिव यांच्यावर केजरीवालांनी जाहीर आरोप केले. मग केंद्र सरकार मधे पडलं आणि नियुक्त्यांचे अधिकार नायब राज्यपालांना असल्याची अधिसूचना काढली. यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र होणार हे नक्की.

दिल्लीकरांनी मोठ्या विश्नासाने केजरीवालांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळवून दिलं, पण आता हेच दिल्लीकर वादात अडकडलेले मुख्यमंत्री विकासकामं करणार तरी कधी, असा सवाल विचारत आहे. शेवटी, या 100 दिवसांचा सारांश म्हणजे थोडा है, थोडे की जरूरत है, असाच केला पाहिजे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close