सर्व्हे : मोदी सरकारला जनतेकडून समाधानाची पावती !

May 26, 2015 3:34 PM0 commentsViews:

modi sarkar survey ibnl26 मे : केंद्रातल्या मोदी सरकारला आज सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण होतंय. याचनिमित्तानं आयबीएन नेटवर्कनं ऍक्सिस एपीएमसोबत एक सर्व्हे केला. यामध्ये सुमारे 23 राज्यांमधल्या 20 हजार लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. सरकार ‘अच्छे दिन’चं वचन पूर्ण करण्यात यशस्वी ठरतंय का याबाबतचा हा सर्व्हे होता. वचनपूर्ती करण्यात सरकार यशस्वी ठरतंय असं बहुसंख्य नागरिकांनी सांगितलं,तर काहींनी विरोधी प्रतिक्रियाही दिलीये. तसंच मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर 72 टक्के लोक समाधानी आहेत. गेल्या वर्षभरात आर्थिक परिस्थिती सुधारली आहे असं 63 टक्के लोकांना वाटतंय.

गेल्या वर्षभरात मोदी सरकारमध्ये कोणताही मोठा भ्रष्टाचार किंवा घोटाळा झालेला नाही, हे मोदी सरकारचं गेल्या वर्षभरातलं सगळ्यात मोठं यश मानलं जातंय. 54 टक्के लोकांनी भ्रष्टाचार कमी झालाय किंवा तसाच आहे अशी प्रतिक्रिया दिलीये. तर मोदी सरकारच्या लोकप्रिय मोहिमेंमध्ये स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सगळ्यांत जास्त लोकप्रिय ठरली आहे. स्वच्छ भारत अभियानाला 86 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. तर पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी आर्थिक योजना तीन चतुर्थांश लोकांनी जन धन योजनेला पाठिंबा दिला आहे.

मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि मुद्रा बँक या मोहिमांना फक्त पाव टक्के लोकांनी पाठिंबा दिलाय. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा मात्र कायमच राहिली आहे.

57 टक्के लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगानं निर्णय घेणारे आणि प्रभावशाली नेते असल्याचं वाटतंय. तर पंतप्रधान जास्त बोलतात आणि काम कमी करतात असं 13 टक्के लोकांना वाटतंय. केंद्र सरकारचं महत्त्वाकांक्षी भूसंपादन विधेयक मात्र काहीसं वादग्रस्त ठरतंय. आणि 36 टक्के लोकांनी आपण सध्याच्या या विधेयकाला पाठिंबा देऊ शकत नाही असं म्हटलंय.

तसंच भाजपच्या मंत्री आणि खासदारांच्या निर्णयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ढवळाढवळ करतं का यावरही वेगवेगळी मतं आढळतायेत.

पण साक्षी महाराज आणि साध्वी निरंजन ज्योती यांच्यासारख्या वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या नेत्यांवर सरकारनं नियंत्रण ठेवलं पाहिजे असं मात्र 32 टक्के लोकांना वाटतंय.

सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ट्विटरवर एक कोटीपेक्षाही जास्त फॉलोअर्स असलेल्या मोदींचं संवादकौशल्य उत्तम असल्याचं बहुसंख्य लोकांना वाटतंय. ‘अगदी मन की बात’मधून रेडिओसारख्या जुन्या माध्यमांतून साधलेला संवाद असो किंवा ट्विटरवरून दिलेले अपडेट्स नरेंद्र मोदी तितकेच लोकप्रिय असल्याचं स्पष्ट होतंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close