देशभर उष्णतेची लाट कायम, तेलंगणा आणि आंध्रमध्ये बळींची संख्या 764 वर

May 26, 2015 3:43 PM0 commentsViews:

Massive-India-heat

26 मे : देशभरातल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनं आतापर्यंत घेतलेल्या बळींचा आकडा 750वर पोहोचला आहे. उष्माघाताचा सर्वाधिक फटका दक्षिणेच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांना बसलाय. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून पारा 47 अंशांवर गेल्याने मोठी जीवितहानी झालेली आहे.

उष्माघातानं या दोन राज्यांत मृत्यू पावलेल्यांचा आकडाच तब्बल 764वर गेला आहे. आंध्र प्रदेशात एका दिवसात 470 जणांचा तर तेलंगणामध्ये 249 जणांचा उष्माघाताने मृत्यू झालाय. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात सर्वात जास्त 98 जणांचा तर तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात 55 जणांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्रातला लागून असलेल्या तेलंगणातल्या अदिलाबाद आणि करीमनगरसह हैदराबादलाही तापमानाचा मोठा तडाखा बसला. याशिवाय उत्तर भारतातल्या दिल्ली आणि इतर राज्यांतही आग ओकणार्‍या सूर्याचा तडाखा गेल्या काही दिवसांपासून जाणवतोच आहे. त्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला. उष्माघातानं मृत्यू पावलेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही कामगार आणि मजुरांची आहे.

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशासह देशभरात येणारे तीन दिवस उष्णतेची ही लाट कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे अंगात वाढलेला उष्म्याचा दाह कमी करण्यासाठी ज्यूस किंवा थंड पेये घेण्याची आणि भर उन्हात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा अशाप्रकारच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close