गँगस्टर मुस्तफाचा कोर्ट परिसरात ‘उद्योग’, मॉडेलचं केलं सिलेक्शन

May 27, 2015 9:46 PM0 commentsViews:

mustaf dosa27 मे : कित्येक वर्षांपासून जेलमध्ये राहूनही गँगस्टर्स आपले धंदे कसे चालवतात, याचा पुरावा आयबीएन लोकमतच्या हाती लागलाय. गँगस्टर मुस्तफा डोसाने मुंबई कोर्ट परिसरात दुबईमधल्या हॉटेलमध्ये काम करण्यासाठी 12 मुलींची पाहणी केली आणि त्यापैकी 2 मुलींची निवडही केली. निवड झालेल्या मुलींना 1 लाख रुपये ऍडव्हान्सही देण्यात आले. विशेष म्हणजे 2 तोतया पोलीस अधिकार्‍यांनी निवडलेल्या मॉडेलला दादर परिसरात लुटलं. ही मॉडेल पोलिसांकडे गेल्यावर हा सगळा प्रकार उघड झाला.

काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्क परिसरात एका मॉडेलला 2 व्यक्तींनी आपण क्राईम ब्राँचचे अधिकारी असल्याचं सांगत तिच्याकडील रोख रक्कम एक लाख रुपये आणि तिचा मोबाईल जप्त केला. या कारवाईनंतर यापैकी एकानं या मॉडेलला एका विषयासंदर्भातील चौकशीसाठी क्राईम ब्राँचच्या कार्यालयात यायलाही सांगितलं. मात्र, जेव्हा ही मॉडेल क्राईम ब्राँचच्या कार्यालयात पोहोचली तेव्हा तिला भेटणार्‍यापैंकी एकही व्यक्ती क्राईम ब्राँचला काम करत नसल्याचं उघड झालं.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या मॉडेलनं यासंदर्भात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी ताबडतोब सूत्र फिरवत या दोन तोतया अधिकार्‍यांना अटकही केलीय. मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मॉडेलकडून लुटण्यात आलेले पैसे हे गँगस्टर मुस्तफा डोसा याच्या इशार्‍यावर देण्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

नेमकं हे सगळं प्रकरण काय होतं ?

- मुस्तफा डोसा सध्या ऑर्थर रोड कारागृहात आहे
- मुस्तफा डोसा याला वेगवेगळ्या प्रकणात सेशन कोर्टात आणलं जातं
- मुस्तफा डोसा याच्या दुबईमध्ये असणार्‍या हॉटेल आणि ज्वेलर्स शॉपसाठी मॉडेल हव्या होत्या
- कोर्टाच्या कामकाज संपल्यानंतर न्यायालयाच्या आवारातच मॉडेल्सचं ऑडिशन घ्यायचं ठरलं
- मे महिन्याच्या सुरुवातीला मुस्तफाला कोर्टात आणलं गेलं
- याच वेळी कोर्टाच्या आवारात 12 मॉडेल्सलाही आणण्यात आलं
- यातली प्रत्येक मॉडेल मुस्तफाच्या डोळ्याखालून जाईल याची पुरेपुर काळजी घेण्यात आली
- यावेळी कोर्टाच्या आवारात मुस्तफाचे अनेक हस्तकही हजर होते
- या मॉडेल्सवर नजर टाकल्यानंतर यातल्या 2 मॉडेल्सची निवड करण्यात आली
- ‘ आप का काम हो गया है , जाने की तैयारी करो ‘ अशा खास शैलीत संदेश देण्यात आला
- या दोघींनाही ताबडतोब 1 लाख रुपये अडव्हान्स देण्यात आले

मात्र, या सगळ्या प्रकरणाची माहिती असणार्‍या एकानं या मॉडेलला लुटायचा प्लॅन केला. कोर्टातनं बाहेर पडलेल्या या मॉडेलवर पाळत ठेवणार्‍या दोन दुचाकीस्वारांनी या मॉडेलला शिवाजी पार्क परिसरात गाठलं आणि आपण क्राईम ब्राँचचे अधिकारी असल्याचं सांगत तिच्याकडचे पैसे उकळले.

या मॉडेलने दिलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलिसांनी सूत्र फिरवत या दोन्ही आरोपींना अटकही केलीय. मात्र, कोर्टात झालेल्या ऑडिशन नाट्यावर मुंबई पोलिस ब्र सुद्धा काढायला तयार नाही. या पूर्वी मुस्तफाला कोर्टाच्या आवारात अगदी बिनधास्तपणे सिगारेटचे झुरके घेताना सगळ्‌या जगानं पाहिलं होतं. त्यामुळे मुस्तफाला मिळणार्‍या स्पेशल ट्रिटमेंटचे नेमक रहस्य तरी काय , याची साधी चौकशी तरी कोण करणार आहे का याकडेच सर्वांच लक्ष लागलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close