अभय कुणाला ?, काळबादेवी दुर्घटनेचा गुन्हा दाखल का नाही ?

May 28, 2015 7:29 PM0 commentsViews:

kalbadevi fire_new_update विनोद राऊत आणि राहुल झोरी, मुंबई

28 मे : काळबादेवी आग दुर्घटनेत अग्निशमन दलाचे 4 अधिकारी शहीद झाले. पण, आगीच्या दुर्घटनेला नेमकं कोण जबाबदार आहे ?, ही आग नेमकी कशामुळे भडकली ?, इमारतीचा व्यावसायिक गैरवापर केला जात असतानाही त्यावर वेळीच कारवाई का झाली नाही ?, असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. याबद्दलचा आयबीएन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट….

काळबादेवीची आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचं स्पष्ट झालंय. या दुर्घटनेसाठी सर्वात महत्वाचं कारण होतं ते म्हणजे त्या इमारतीचा व्यावसायिक कारणासाठी होणारा गैरवापर. या अहवालात असं नमूद केलं आहे की,

1) इमारतीचा वापर राहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणासाठी
2) इमारत बांधकामात मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर
3) तळमजल्यावरील गोडाऊनमध्ये कपडे, साड्या, सिथेंटिक ड्रेस मटेरिअलचा साठा
4) मोबाईल, बॅटरीचा मोठा साठा
5) इमारतीच्या दुरुस्तीच्यावेळी प्लॅस्टिक आणि बांबूंचा वापर
7) ज्वेलरी दुकानात एलपीजी सिलेंडरच्या स्फोटामुळे आग भडकली आणि इमारतीला तडे गेले
8) इमारतीमध्ये मोठ्याप्रमाणात छोटे सिलेंडर होते
9) अनेक अडथळ्यांमुळं अग्निशमन करण्यात अनेक समस्या आल्या

म्हणजेच सर्व नियम धाब्यावर बसवून या इमारतीत ज्वलनशील मटेरियअलची साठवणूक होत होती. त्यामुळंच इमारतीची आग केवळ 30 मिनिटांतच पहिल्या मजल्यावरुन चवथ्या मजल्यावर पोहोचली. आणि या सर्वामुळे ही आग फायर ब्रिगेडच्या जवानांच्या हाताबाहेर गेली. 4 तासांतच इमारत पुर्णतः जळाली. या आगीत फायर ब्रिगेडच्या चार बड्या अधिकार्‍याचा जीव गेला. हे सर्व स्पष्ट असताना दोषी असलेल्या व्यापार्‍यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का केला जात नाही, असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

मुंबई आणि ठाण्यात गेल्या दोन वषांर्त अनेक जुन्या इमारती कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. या सर्व प्रकरणात बिल्डर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. त्याखेरीज या प्रकाराकडे डोळेझाक करणार्‍या पालिका अधिकार्‍यांनाही अटक केली गेली.
गंभीर कलमे लावल्याने त्यातील अनेकांना तर अनेक महीने जामीन देखील मिळाला नाही. मग काळाबादेवी प्रकरणात अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असं निवृत्त पोलीस अधिकार्‍यांचं म्हणणं आहे.

या इमारतीचं स्ट्रक्चरल सेफ्टी ऑडिट करण्यात आलं होतं का ?, जर केलं असेल, तर त्याच्या रिपोर्टचं काय झालं ?, याचं स्पष्टीकरण अजूनही पालिकेकडून आलेलं नाही. महाराष्ट्र आगप्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 मध्ये, अग्निशमन प्रतिबंधक उपायोजना मालक किंवा भाडेकरुंनी करणं बंधनकारक आहे. तसं न केल्यास इमारतीचा मालक बेपत्ता असल्यास, सध्याच्या रहिवाशांविरुद्ध  कारवाई करण्याची तरतूद आहे. या दुर्देवी घटनेच्या निमित्ताने प्रशासनाने  कडक उपाययोजना केल्यास आपली जबाबदारी टाळणार्‍या प्रत्येकावर अंकुश बसेल आणि या घटनांना आवर घालता येईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close