ज्येष्ठ पत्रकार प्रभाष जोशी यांचं निधन

November 6, 2009 9:43 AM0 commentsViews: 1

6 नोव्हेंबर जेष्ठ पत्रकार प्रभाष जोशी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं गुरूवारी दिल्लीत निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. जोशी 'जनसत्ता'चे संस्थापक संपादक होते. त्यांनी हिंदी पत्रकारितेला सामाजिक भान दिलं होतं. राजकारणासोबतच त्यांचा क्रिकेटचाही चांगला अभ्यास होता. अनेक सत्ताधार्‍यांना जोशी यांचा सल्ला घेण्यात मोठेपणा वाटायचा. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांना ते मोठे आधार होते. जोशी लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे जवळचे सहकारी होते. त्यांचे इंडियन एक्सप्रेस समुहाचे मालक रामनाथ गोयंका यांच्याशीही जवळचे संबंध होते. 'नयी दुनिया' पासून प्रभाष जोशींनी पत्रकारितेला सुरुवात केली. 'जनसत्ता'तून 1995 मध्ये निवृत्त झाल्यानंतरही ते 'जनसत्ता'चे मुख्य सल्लागार म्हणून काम करत होते. मुळचे इंदौरचे असलेल्या या ध्येयवादी पत्रकाराच्या लेखणीने हिंदी पत्रकारितेला नवी दिशा दिली. त्यांच्या कार्यकाळात 'जनसत्ता'नं हिंदी पत्रकारितेची व्याख्याच बदलून टाकली. ज्या ज्या वेळी पत्रकारांवर हल्ले झाले, त्या वेळी जोशी खंबीरपणं त्यांच्या पाठीशी उभे राहिले. जोशी यांनी इंडियन एक्प्रेसच्या अहमदाबाद, चंदिगढ, दिल्ली आवृत्तीचे निवासी संपादक म्हणूनही काम केलं होतं. क्रिकेटची आवड असणार्‍या जोशी यांना काल भारत- ऑस्ट्रेलियाचा सामना सुरु असतानाच हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच निधन झालं. शनिवारी इंदौर इथे जोशी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यत येणार आहेत.

close