आता ‘त्यांना’ पाड्यावर टीव्ही पाहता येणार !

June 2, 2015 6:03 PM0 commentsViews:

JAWHAR SOLAR PROJECT3तुषार नगरकर, जव्हार

02 जून : मुंबईपासून 150 किलोमीटर अंतरावर पालघर जिल्ह्यातला जव्हार तालुका…आदिवासी तालुका अशी त्याची ओळख आहे. जव्हार तालुक्यातल्या दुर्गम भागातल्या सात पाड्यांवरच्या आदिवासींच्या जीवनात आता नवा प्रकाश आलाय. सौर ऊर्जेमुळे आता इथले आदिवासी पाडे आधुनिक जगाशी जोडले जाणार आहेत.

जव्हार तालुक्यातल्या हेदोली, दखनेपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, वडपाडा, भाटीपाडा आणि नवापाडा या सात पाड्यांचा आता कायापालट होणार आहे. आतापर्यंत या पाड्यांना जेमतेम विजेचे दिवे मिळू शकले होते. आता मात्र सौर ऊर्जेद्वारे आदिवासींच्या कुडाच्या झोपडीत दिव्याच्या प्रकाशाबरोबरच आता पंखे फिरणार आहेत आणि टीव्हीच्या माध्यमातून आधुनिक जगाशीसुद्धा नाळ जोडली जाणार आहे.

प्रगती प्रतिष्ठान आणि ग्रामऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प राबवलाय. त्यासाठी आयसीआयसीआय बँकेनं 1 कोटी 39 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय. इथल्या प्रत्येकाच्या घरी वीजेचे स्वतंत्र मीटरही बसविण्यात आले आहेत. प्रत्येक कुटुंबाला दरमहा किमान शंभर रुपये वीज बिल भरावं लागेल.

100 टक्के आदिवासी असलेल्या या पाड्यांमध्ये मूलभूत सुविधा अजूनही पोहोचल्या नाहीत. परंतु सौरऊर्जा युनिटमुळे त्यांची किमान रोजगार, पाणी आणि या वीज या समस्यांतून तरी सुटका होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close