38 मंत्र्यांनी घेतली शपथ : दिग्गजांचा पत्ता कट

November 7, 2009 2:33 PM0 commentsViews: 15

7 नोव्हेंबर आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेरीस शनिवारी पार पडला. पण त्यात कित्येक दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आलाय. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आला. तर काँग्रेसच्या हेवी वेट नेत्यांच्या मुलांनाही डच्चू देण्यात आला. काँग्रेसच्या पाच मंत्रिपदाच्या जागा शिल्लक असल्यामुळे एकीकडे कित्येकांच्या आशा अजूनही पल्लवित आहेत. तर दुसरीकडे गुरुदास कामतांसारख्या नेत्यांनी शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहून आपली नाराजी व्यक्त केली.राष्ट्रवादीने माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांना विधानसभेचं अध्यक्षपद देऊ केलं होतं. पण मंत्रिपदासाठी अडून बसलेल्या वळसे पाटलांचं म्हणणं काही कोईमतूरमध्ये असलेल्या पवारांनी ऐकलं नाही. माजी आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही यंदा राष्ट्रवादीने सरकारमध्ये स्थान दिलं नाही. त्यांचं आरोग्य खातंही आता काँग्रेसकडे गेलं आहे.गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विमल मुंदडा यांचा परफॉर्मंस फारसा चांगला नव्हता, त्यात त्यांची तब्येतही चांगली नसल्याने त्यांना यंदा संधी देण्यात आली नाही. राष्ट्रवादीचे माजी कामगार मंत्री नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांना अण्णा हजारेंनीही विरोध केलाय. त्यामुळे त्यांच्याऐवजी यंदा सचिन अहिर यांची वर्णी लागली. सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे बडे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचंही नाव यंदा मंत्रिमंडळात नाही. विधानसभेची निवडणूक हरल्यानंतर. आता त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. जनसुराज्य शक्तीच्या विनय कोरेंनी ही विधानसभेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध लढवली. त्यांचे सर्व समर्थकही निवडणुकीत पडले. या कारणांमुळे त्यांचाही पत्ता कट झाला. कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेले माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंग यांनाही मंत्रिमंडळात जागा देण्यात आली नाही. पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिलं जाणार नाही, असा निर्णय काँग्रेसने घेतल्याने राहूल ब्रिगेडच्या एकाही आमदाराला मंत्री होण्याची संधी मिळाली नाही. बड्या नेत्यांच्या मुलांनाही अशोक चव्हाणांच्या मंत्रिमंडळात जागा नाही. अमित विलासराव देशमुख, प्रणिती सुशीलकुमार शिंदे, राजेंद्र देवीसिंग शेखावत यांना मंत्री होण्यासाठी अजून काही काळ थांबावं लागणार आहे. आपल्या समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, म्हणून नारायण राणेंना धक्का बसलाय. तर याच कारणामुळे केंद्रीय मंत्री गुरुदास कामतही नाराज आहेत. शपथविधी सोहळ्याला गैरहजर राहून त्यांनी ही नाराजी व्यक्त करून दाखवली आहे. आता सरकार स्थापन झालं असलं तरी या डझनभर नेत्यांची नाराजी दूर करणं हे दोन्ही पक्षांच्या हायकमांडसमोरचं मोठं आव्हान आहे. अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळातील शपथ घेतलेले मंत्री आघाडीच्या 38 मंत्र्यानी शनिवारी शपथ घेतली यामध्ये काँग्रेसच्या अठरा तर राष्ट्रवादीच्या वीस मंत्र्याचा समावेश आहे. यात 27 कॅबिनेट आणि 11 राज्यमंत्र्यांचा शपथ घेतली. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह काँग्रेसच्या अठरा मंत्र्यानी शपथ घेतली. या मध्ये अशोक चव्हाण, नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, राजेंद्र दर्डा, पतंगराव कदम, नसीम खान, सुरेश शेट्टी, नितीन राऊत, सुभाष झनक यांनी कॅबीनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार्‍यांमध्ये छगन भुजबळ, आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील, सुनील तटकरे, मनोहर नाईक, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, विजयकुमार गावित, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, लक्ष्मण ढोबळे, रामराजे निंबाळकर, बबनराव पाचपुते, अनिल देशमुख ह्यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीच्याच राज्यमंत्री म्हणून भास्कर जाधव, सचिन अहिर, फौजिया खान, प्रकाश सोळंके, गुलाबराव देवकर यांनी शपथ घेतली. तर काँग्रेस मधील विजय वडेट्टीवार, रमेश बागवे, अब्दुल सत्तार, वर्षा गायकवाड, पद्माकर वळवी यांनी शपथ घेतली.

close