पाऊस आला रे..,मान्सून 2 दिवसांत महाराष्ट्रात !

June 5, 2015 4:25 PM0 commentsViews:

mansoon in maha05 जून : उन्हामुळे जीवाची काहीली झालेल्या तमाम मान्सून प्रेमींना खुशखबर…अखेर उन्हाच्या लाहीतून सुटका होणार आहे. सर्वांना हवाहवासा मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. तसंच केरळपासून पुढे मान्सूनची आगेकूच वेगानं सुरू आहे, अशी माहितीसुद्धा वेधशाळेनं दिलीये. केरळसकट तामिळनाडूचाही अर्धा भाग मान्सूननं व्यापला आहे. पावसामुळे केरळ आणि तामिळनाडूत हवेत गारवा निर्माण झालाय. विशेष म्हणजे, पर्यावरणदिनीच पावसाने हजेरी लावून सर्वांना गारेगार दिलासा दिलाय. तर महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत पाऊस दाखल होईल, असा अंदाज मुंबई वेधशाळेचे उपसंचालक के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केलाय.

मुंबईसह राज्यात काही ठिकाणी सरी

दरम्यान, मुंबईसह राज्यातल्या अनेक भागात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाच्या सरींही आल्यात. त्यामुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळणार आहे. पिंपरीमध्ये आज (शुक्रवारी) सकाळी हलकासा पाऊस झाला. हिंगोलीत सलग दुसर्‍या दिवशी ढगाळ वातावरणासह पावसाने हजेरी लावली. आज सकाळीही पाऊस झाला. सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने वातावरणात थंडावा निर्माण झालाय. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पहाटे पासून हलकासा पाऊस पडला. काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. नगर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात विजेंचा कडकडाटासह पावसाच्या सरी पडल्या.

सर्वसामान्यांना थंडाव पण बळीराजाचा जीव टांगणीला

मान्सून दाखल झाल्यामुळे सर्वांना गारेगार दिलासा मिळालाय. पावसाच्या आगमानामुळे बळीराजा सुखावलाय. पण, त्याची चिंता अजूनही कायम आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमीच होणार आहे. यंदा 88 टक्के पाऊस पडणार असं भाकित हवामान खात्याने वर्तवलंय. त्यामुळे बळीराजाचा जीव टांगणीला लागलाय. मागील वर्षीही जूनमध्ये पावसाने हजेरी लावली पण त्यानंतर पाठ फिरवली होती. यंदा तरी जास्त पाऊस पडावा अशी आशा बळीराजा बाळगून आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close