चेक बाऊन्स प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आ. मनिष जैन यांना 1 वर्षाची शिक्षा

June 8, 2015 5:02 PM0 commentsViews:

08 जून : राष्ट्रवादीचे माजी आमदार मनिष जैन यांना 1 वर्षाची शिक्षा झालीये. चेक बाऊन्स झाल्या प्रकरणी जैन यांना ही शिक्षा सुनावण्यात आलीये. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय. 2003 झाली जळगाव जिल्हा बँकेकडून महावीर अर्बन पतसंस्थेने घेतलेल्या 10 कोटींच्या, कर्जाच्या परत फेडीसाठी महावीर पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार मनीष जैन यांच्या सहीचा तो चेक होता.mansih jain

जळगाव येथील महावीर अर्बन को-ऑप. सोसायटीने जिल्हा बँकेला दिलेले दोन वेगवेगळे धनादेश अनादर प्रकरणी आज तब्बल 12 वर्षांनी निकाल लागला. पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन तथा माजी आमदार मनिष जैन यांना सत्र न्यायालयाने आज एक वर्षाची कैदेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे दोन वेगवेगळ्या निकालात एकूण 11 कोटीची भरपाई महिना भराच्या आत भरण्याचे आदेश महावीर अर्बन को-ऑप. सोसायटीला न्यायालयाने दिले आहेत. या निकालामुळे एकच खळबळ उडाली आहे .

महावीर अर्बन को-ऑप. सोसायटीने जिल्हा बँकेकडून 10 कोटींचे कर्ज घेतले होते. 2002 मध्ये तत्कालीन चेअरमन मनिष जैन, संचालक सुरेंद्र लुंकड, सुभाष साखला यांच्या स्वाक्षरीने जिल्हा बँकेला तीन कोटीचा पहिला चेक देण्यात आला. त्यानंतर पुन्हा 5 कोटी 28 लाख 33 हजाराचा दुसरा चेक देण्यात आला. जिल्हा बँकेचे हे दोन्ही चेक न वटल्यामुळे बँकेचे तत्कालीन कर्मचारी भिला शामराव पाटील यांनी तिघांविरूद्ध खटला दाखल केला होता. हा खटला तब्बल 12 वर्षं चालल्यानंतर आज दुपारी न्या.ए.एम. मानकर यांनी निकाल दिला. या निकालात त्यांनी तीन कोटीचा धनादेश न वटल्यामुळे चार कोटींची नुकसान भरपाई एक महिन्याच्या आत भरण्याचे आदेश आणि एक वर्षांची साधी कैदेची शिक्षा सुनावली. तर दुसर्‍या खटल्यात सात कोटींची नुकसान भरपाई आणि तसंच एक वर्षाची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी जिल्हा बँकेतर्फे ऍड. सागर चित्रे यांनी काम पाहिले.

दरम्यान, मनीष जैन यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज भरला तो मंजूर करण्यात आला आहे, या प्रकरणी बोलतांना त्यांनी सांगितलं की, न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. 2003 साली ज्यावेळी हा चेक अनादर झाला त्यावेळी आपण चेअरमन पदावर नव्हतो, राजकीय आकसापोटी ही केस आपल्यावर करण्यात आली असल्याचा आरोप ही त्यांनी केला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close