मनसेच्या राड्यावर मीडियातून जोरदार टीका

November 10, 2009 7:21 AM0 commentsViews: 4

10 नोव्हेंबर मनसेच्या आमदारांनी विधानसभेत घातलेल्या गोंधळावर मीडियातून जोरदार टीका होतेय. सगळ्याच न्यूजपेपर्सच्या पहिल्या पानावर मनसेच्या राड्यावर टीका करणारी हेडिंग्ज् झळकतायत. 'महाराष्ट्र टाइम्स'नं 'मराठीवरुन आखाडा' असं हेडिंग देऊन मनसेनं केलेल्या विधानसभेच्या आखाड्याची सविस्तर बातमी दिली आहे. विधानसभेतील 'राडा' नावाचा अग्रलेखही 'महाराष्ट्र टाइम्स'नं लिहिलाय. 'लोकसत्ते'नं 'राडा राज' नावाच्या आपल्या मुख्य बातमीत विधानसभेतल्या आखाड्याचं सविस्तर वृत्त दिलंय. त्याचप्रमाणे पहिल्याच पानावर अबू आझमींशिवाय इतरांनी हिंदी, इंग्रजीतून घेतलेल्या शपथेला मनसे आमदारांनी विरोध का नाही केला? असा सवाल उपस्थित केलाय. 'विधानसभेचा आखाडा' या अग्रलेखातही मनसेच्या विधानसभेतल्या कृत्याचा समाचार घेतलाय. 'लोकमत'नं 'विधानसभेत अराजक' हेडिंग देऊन विधानसभेतला गोंधळ पहिल्या पानावर सविस्तरपणं मांडलाय. याशिवाय 'राजभाषेच्या देव्हार्‍यात धुडगुस कशासाठी?' या संपादकीयमधून मनसेच्या भाषेबाबतच्या धोरणावरून साधकबाधक चर्चा केलीय. दैनिक 'सकाळ'नंही 'विधानसभेत अराजक' असं हेडिंग देत मनसेच्या विधानसभेतल्या गोंधळाला मुख्य बातमीचं स्थान दिलंय. राज्याच्या सुवर्ण महोत्सवात मनसेनं विधानसभेच्या प्रतिष्ठेचा बळी घेतलाय, असं 'सकाळ'नं आपल्या अग्रलेखात म्हटलंय. 'सामना'नंही 'आझमींना मारहाण' अशी हेडलाईन देत विधानसभेतल्या गोंधळाचं सविस्तर वृत्त दिलंय. तर विधानसभेतल्या या गोंधळाची 'आपलं महानगर'नं' विधानसभेत राडा : मनसेत दुफळी' अशी 'बॅनरलाईन' केलीय. 'झुंडशाहीकडून झुंडशाहीकडे' असं संपादकीयही 'महानगर'नं पहिल्या पानावर लिहिलंय. एरवी राष्ट्रीय बातम्यांना प्राधान्य देणार्‍या इंग्रजी पेपर्सच्या पहिल्या पानांवरही महाराष्ट्र विधानसभेतल्या गोंधळ ठळकपणे छापण्यात आलाय. एकूणच मनसेच्या आमदारांनी विधानसभेत घातलेल्या गोंधळावर सर्वच मीडियानं कडक टीका केलीय.

close