अजित पवारांची ‘दादा’गिरी

November 10, 2009 1:38 PM0 commentsViews: 34

10 नोव्हेंबरराष्ट्रवादीच्या खातेवाटपात अजित पवारांचं वर्चस्व राहिलेलं स्पष्ट दिसतंय. अजित पवार यांच्या जवळच्या माणसांना महत्वाची खाती मिळालीत, तर इतरांना मात्र साईड ट्रॅक केलेलं दिसतंय. उपमुख्यमंत्रीपदावरुन नाराज असलेल्या अजित पवारांना खातेवाटपात खुष करण्यात आलंय. त्यांच्या जवळच्या माणसांना मलईदार खाती मिळालीयत. साईड ट्रॅक करायला सुरुवात झाली ती दिलीप वळसे पाटलांपासून. कारण आधीच अजितदादांचं आणि त्यांचं बिनसलं होतं. दुसरीकडे वाळव्याच्या जयंत पाटलांना गृहखातं हवं होतं, पण त्यांना मिळालंय ग्रामविकास खातं. आणि गृहखातं पुन्हा गेलं आर. आर. आबांकडे. कारण जयंत पाटलांपेक्षा आर.आर.आबा अजित पवारांना जास्त जवळचे. तशी चर्चाच राष्ट्रवादीत आहे. जयंत पाटील यांचा दुसरा दावा असलेलं अर्थखातंही सुनिल तटकरेंना मिळालं. तटकरे अजित पवारांचे सगळ्यात विश्वासू मित्र मानले जातात. विशेष म्हणजे त्यांच्याकडचं आधीचं अन्न आणि नागरी पुरवठा खातंही अजित पवारांच्याच आणखी एका माणसाला मिळालय, ते म्हणजेअनिल देशमुख. प्रत्येक सरकारमध्ये आदिवासी विकास खातं हे आदिवासी मंत्र्यालाच द्यायचे हे संकेत आहे. राष्ट्रवादीकडं विजयकुमार गावित यांच्या रूपानं एक चांगला चेहरा आदिवासी चेहरा होता. पण हे गेलं बबनराव पाचपूते यांना. बबनराव हे अजित दादांचे दुसरे विश्वासू समर्थक. या सगळ्यावर कडी केली ती खुद्द अजित पवार यांनीच. जलसंपदा सारखं आधीचं महत्वाचं खातं शिवाय पुढच्या 5 वर्षात सगळ्यात महत्वाचं असणारं उर्जा खातं अजितदादांना मिळालंय. राष्ट्रवादीचं खातेवाटप हे अजित पवारांच्या मनासारखं झालं असं म्हटलं जातंय. आत्तापर्यंत अजित पवार पडद्यामागून बरीच सूत्र चालवायचे पण आता अजित पवार यांच्या पडद्यावरच्या आणि पडद्या मागच्या कृत्यांवर त्यांचं बारीक लक्ष असणार आहे, असंच दिसतंय.

close