दहावीत नापास विद्यार्थ्यांसाठी ‘अच्छे दिन’, जुलैमध्येच फेरपरीक्षा

June 11, 2015 6:36 PM0 commentsViews:

10th july exam11 जून : शिक्षणाचा पहिला ‘टर्निंग पाईंट’ समजल्या जाणार्‍या दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय. आता ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी वाट पाहण्याची गरज नसून जुलैमध्येच फेरपरीक्षा देता येणार आहे अशी दिलासादायक घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलीये. या परीक्षेचा निकालही एका महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्येच लागणार आहे. त्यामुळे निकालमुळे खच्चून गेलेल्या विद्यार्थ्यांना मोठी खुशखबर मिळालीये.

यंदा दहावीच्या परीक्षेत राज्याचा विक्रमी असा 91 टक्के निकाल लागला. सर्वत्र दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक होतंय तर दुसरीकडे नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये स्मशान शांतता पसरली होती. मात्र, नापास विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जावू नये यासाठी राज्य सरकारने हालचाल सुरू केली. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दहावीची फेरपरीक्षा जूनमध्येच घेण्याचे संकेत दिले होते. एवढंच नाहीतर दोनच दिवसांपूर्वी पुढच्या वर्षापासून दहावीत कुणी नापास होणार नाही असा दावा विनोद तावडे यांनी केला होता. अखेर तावडेंनी आपला शब्द खरा ठरवलाय. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जावू नये यासाठी आता ऑक्टोबरची परीक्षा जुलैमध्येच होणार आहे. राज्यात दीड लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांना आता मोठा दिलासा मिळालाय.

नापास झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात होणार आहे. या परीक्षेचा निकाल एका महिन्यात लागणार आणि सप्टेंबरमध्येच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. पुढच्या वर्षी अशीच परीक्षा होईल, यामध्ये पुन्हा नापास झाल्यास त्या विद्यार्थ्यांचं वैयक्तिक कौन्सिलिंग होईल आणि कौशल्य विकासाकड़े विद्यार्थ्यांना वळवण्यात येईल. त्यामुळे पुढील वर्षी कुणाच्या मार्कशीटमध्ये अनुत्तीर्ण हे राहणार नाही अशी माहिती तावडेंनी दिली.

तसंच 350 शाळांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी निकाल लागलाय. या शाळांचे मुख्याध्यापक किंवा शाळा संचालक यांची बैठक जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेऊन चर्चा करणार आणि त्यांच्या अडचणी जाणून घेणार असंही विनोद तावडे यांनी सांगितलं. आताची प्रवेश प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे. काही जागा राहतील तर त्या उत्तीर्णमधून भरल्या जाणार आहे.

#ऑक्टोबरवारीबंद

- नापास विद्यार्थ्यांची जुलैमध्येच होणार दहावीची परीक्षा
– जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात परीक्षा
– ऑगस्टमध्ये निकाल
– सप्टेंबरमध्येच महाविद्यालयात मिळणार प्रवेश
– राज्यात दीड लाख विद्यार्थी नापास

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close