विविध रंग, आकारातील छत्र्या दाखल

June 12, 2015 3:48 PM0 commentsViews:

समृध्दा भांबुरे, मुंबई

12 जून : पावसाळ्याची सुरूवात झाली आहे आणि पावसापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी रंगबिरंगी, छोट्या- मोठ्या आकारातल्या आणि नावीन्यपूर्ण छत्र्यांनी बाजारपेठा बहरल्या आहेत.

बॅगेत सहज मावणारी किंवा हातात घेऊन मिरवता येणारी… विविध रंगांच्या, विविध आकाराच्या छत्र्यांची बाजारात मोठी गर्दी आहे. मोठ्या आकाराच्या छत्र्या आजही लोकप्रियता टिकवून आहेत.  मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये अगदी 250 ते 900 रुपयांपर्यंत छत्र्या मिळू शकतील.

मोठ्या दांड्याच्या छत्र्या गेल्या काही वर्षांपासून पुन्हा फॅशनमध्ये आल्या आहेत. या छत्र्या युनिसेक्स असल्यामुळे मुली किंवा मुलं कोणीही वापरू शकतात.

काळाच्या ओघात छत्र्यांचा आकार, कापडाचा रंग आणि मटेरीयल बदलत गेला. यंदा बाजारात 24 काड्यांची छत्री असा एक नवीन प्रकार पाहायला मिळेल. सुंदर गोल आकारातल्या या छत्र्या कलरफुल प्रिंट किंवा पोल्का डॉट्समध्ये उपलब्ध आहेत. ऍटोमॅटिक बटणाच्या छत्र्या, तिघांना सामावून घेणारी ‘सुपर जम्बो’ छत्री आणि दोन आणि तीन फोल्डच्या छत्र्यांचे पर्यायही ग्राहकांना उपलब्ध आहेत.

नेहमीच्या काळ्या छत्र्यांच्या व्यतिरिक्त यंदा बाजारात चमकदार रंगांच्या ‘निऑन छत्र्याही उठून दिसतायत. या छत्र्यांची महिला वर्गात विशेषत: कॉलेज तरूणींमध्ये मोठी क्रेझ आहे. निऑन छत्र्यांबरोबरच फ्रिलच्या छत्र्या, न्यूज प्रिंट असलेल्या छत्र्या असे विविध पर्याय तरूणींसाठी उपलब्ध आहेत.

बच्चे कंपनीसाठीही यावर्षी बाजारात बरेच ऑप्शन्स उपलब्ध आहेत. लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘छोटा भीम’, ‘बार्बी’ अशा अनेक कार्टून्स आणि प्राण्यांची प्रिंट असलेल्या छत्र्या बाजारात आलेल्या आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close