आघाडीच्या काळात रेशन माफियांना मंत्र्यांचंच अभय !

June 12, 2015 10:07 PM0 commentsViews:

शैलेश तवटे, नवी मुंबई

12 जून : आघाडी सरकारच्या काळात राज्यातल्या रेशन माफियांना मंत्रीमहोदयांकडूनच अभय मिळाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. कारण रेशन कंत्राटदार संस्थावर प्रशासनाने धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी कारवाई केलीये. त्यातल्या बहुतांश संस्थांना तत्कालीन अन्न धान्य आणि पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी अपिल सुनावणी दरम्यान पुन्हा परवाने बहाल केल्याचं माहिती अधिकारांतर्गंत उघडकीस आलंय. पाहुयात रेशनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश करणारा आयबीएन लोकमतचा हा स्पेशल रिपोर्ट….reshan mafiya4

माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या रेशन धान्य परवाना कंत्राटदारांच्या यादीवर बारकाईने नजर टाकली तर तुमच्या सहज लक्षात येईल की…ज्या घोटाळेबाज संस्थांवर प्रशासनाने धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेत. नेमक्या त्याच संस्थांना मंत्री महोदयांनी अपिल सुनावणीत पुन्हा परवाने बहाल केलेत. मंत्र्यांनी अभय दिलेल्या अशा एकूण 27 संस्था आहेत. त्यातल्या काही प्रमुख घोटाळेबाज संस्थांवर आपण नजर टाकुयात….

मंत्र्यांचं ‘अभय’ मिळालेल्या संस्था
अन्नपूर्णा सप्लाय सर्व्हिस, 5 वेळा कारवाई
महालक्ष्मी ग्रेन डिलर्स, 4 वेळा कारवाई
सिद्धिविनायक ग्रेन डिलर्स, 3 वेळा कारवाई
मारीवाला भाटिया कन्झ्युमर्स सोसायटी, 3 वेळा कारवाई
सूरज ग्रेन डिलर्स वेल्फेअर असोसिएशन – 3 वेळा कारवाई

मंत्र्यांचे अभय मिळालेल्या या संस्थांची यादी बरीच लांबलचक आहे. यातली माताभवानी या संस्थेचा परवाना निलंबित होऊनही बिनदिक्तपणे सुरू आहे.

या घोटाळेबाज संस्थांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर कायमची बंदी घालावी, अशी मागणी तक्रारदारांकडून होतेय. या घोटाळेबाज संस्थांवर जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी वेळोवेळी कारवाई देखील केलीय. एवढंच नाहीतर गुन्हे सुद्धा दाखल आहेत.

आम्ही फक्त एवढं करूनच थांबलो नाहीतर कारवाई झालेल्या एका रेशन संस्थाचालकालाही गाठून त्याला बोलतं केलं असता त्याने सरळ सरळ मंत्री पैशे खात असल्याचा आरोप केला.

या घोटाळेबाज संस्थांना अभय देणारे मंत्री आता खरंतर घरी बसलेत. राज्यातही सत्तांतर झालंय म्हणूनच विद्यमान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट तरी या रेशन माफियांवर कारवाई करणार का हाच प्रश्न आहे.

आयबीएन लोकमतचे सवाल

- अनिल देशमुख रेशन माफियांना पाठीशी का घालत होते ?
- अनिल देशमुखांनी मंत्रिपदाच्या विशेषाधिकाराचा गैरवापर केलाय का?
- देशमुखांनी घोटाळेबाजांना नेमक्या कशाच्या आधारे रेशनचे परवाने बहाल केले ?
- मंत्रिस्तरावरील अपिलाच्या सुनावणीत पारदर्शकता कधी येणार ?
- फडणवीस सरकार तरी या रेशन माफियांवर कारवाई करणार का ?
- या रेशन माफियांचे परवाने गिरीष बापट रद्द करणार का ?

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close