फियान चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला झोडपले

November 11, 2009 2:12 PM0 commentsViews: 83

11 नोव्हेंबर फियान चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला झोडपून काढलंय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही ठिकाणी फियानने थैमान घातलं. गोव्याहून कोकणाकडे सरकलेलं फियान 130 किलोमीटर बाहेरून गेलं, तरीही एकट्या रत्नागिरीतला त्याचा फटका बसला. रत्नागिरी जिल्ह्यात 560 घरांची पडझड झाली. वादळामुळे मिरे बंदरातल्या किनार्‍यावर समुद्रात 2 मच्छीमार नौका बुडाल्यात. रत्नागिरीत विजेच्या खांबांवर झाडं कोसळल्याने अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. विजपुरवठा सुरळीत होण्यासाठी पुढचे 2 ते 3 दिवस लागणार आहेत. लांजा आणि राजापूर भागात जोरदार पाऊस आणि प्रचंड वेगवान वार्‍यामुळे अनेक घरांची छपरं उडाली आहेत. देवगडमध्ये 7 नौका, तर विजयदुर्गमध्ये 2 नौका बेपत्ता झाल्या. यातले 30 मच्छीमार अजूनही बेपत्ता आहेत. बुधवारी दिवसभर नेव्हीचे दोन हेलिकॉप्टर्स आणि एक बोट त्यांचा शोध घेत होती. मालवणलाही वादळाचा तडाखा बसला आहे. यामुळे 40 मच्छीमार ट्रॉलर तर 60 ते 70 छोट्या बोटींचं नुकसान झालंय. दरम्यान, सर्व फियानग्रस्तांना मदत देण्यात येईल, असं आश्वासन महसूलमंत्री नारायण राणे यांनी दिलं आहे. रायगडलाही फटका रायगडमध्येही फि यानने तडाखा दिला. काही ठिकाणी घरांवरची छपरं उडाली, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या नागरिकांची तारांबळ उडत होती. रात्री हे वादळ अलिबागकडे येणार असं म्हटलं जात होतं, पण तो धोका आता टळलाय. अलिबागजवळच्या हरनाई इथं पोहोचल्यानंतर चक्रीवादळाचा जोर अत्यंत कमी झाला. त्याचा वेगही मंदावल्यामुळे डहाणू आणि पालघर इथल्या किनार्‍याजवळच्या गावकर्‍यांना सुरक्षित जागी हलवण्याची प्रक्रिया थांबवण्याच्या सूचनेचे आदेश ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

close